हसन मुश्रीफांच्या पाठीशी मुरगूड नगरपालिका

सर्वसामान्य माणसांसाठी राजकीय हयात खर्च करणाऱ्या मंत्री मुश्रीफ यांना षड्यंत्र करून बदनाम करण्याच्या भाजपच्या राजकीय सुडबुद्धीचा निषेध करण्यात आला.

    मुरगूड : भाजप पळपुट्यांचा पक्ष असून, राजकीय स्पर्धेत आपल्याला वरचढ ठरणाऱ्या व जनमानसात स्थान असणाऱ्या नेत्यांना टार्गेट करणाऱ्या भाजपच्या राजकीय कुरघोड्यांचा जाहीर निषेध करत महाविकास आघाडीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्धार मुरगूड नगरपालिका नगरसेवकांच्या बैठकीत करण्यात आला.

    ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपाच्या निषेधार्थ नगरपालिकेच्या शिवसेना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी निषेध बैठक आयोजित केली होती. महाराष्ट्राचे कर्तुत्ववान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी एकसंघ पणे वाटचाल करत आहे.
    कर्तृत्ववान नेते मंत्र्यांना शासकीय यंत्रणा पाठीशी लावून त्यांचे राजकीय कारकीर्द संपवण्याचा दृष्ट हेतू भाजपचा आहे.

    सर्वसामान्य माणसांसाठी राजकीय हयात खर्च करणाऱ्या मंत्री मुश्रीफ यांना षड्यंत्र करून बदनाम करण्याच्या भाजपच्या राजकीय सुडबुद्धीचा निषेध करण्यात आला. या बैठकीस शिवसेनेचे शहरप्रमुख व नगरसेवक नामदेव मेंडके, नगराध्यक्ष राजेखान जमादार, उपनगराध्यक्षा रंजना मंडलिक, नगरसेवक जयसिंगराव भोसले, दलित मित्र दत्ता चौगुले, माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर, माजी नगराध्यक्ष पांडुरंग भाट, माजी नगरसेवक शिवाजीराव चौगले, दीपक शिंदे यांच्यासह शिवसेनेचे सर्व आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.

    श्रावणबाळ पुरून उरतील…

    आपल्या राजकीय कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्रात श्रावण बाळ अशी ओळख असणाऱ्या मंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात भाजपने रचलेले हे कटकारस्थान आहे. मात्र, सर्वसामान्य जनता त्यांच्याभोवती अभेद्य कडे निर्माण करून ठामपणे उभी राहिली आहे. त्यामुळे भाजपच्या कूटनितीला यश येणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असाच प्रकार यापूर्वी घडला होता. त्या सर्वाला श्रावणबाळ असलेले मंत्री मुश्रीफ पुरून उरले होते.