हुपरीचे उपनगराध्यक्ष भरतराव लठ्ठे यांच्यावरील अविश्वास ठराव १४ विरुध्द ० मतांनी मंजूर

भाजपच्याच उपनगराध्यक्षावर अविश्वास मंजूर झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेला आनंदोत्सव चर्चेचा विषय बनला असून, यापुढे सत्ताधारी व विरोधात एकमेकांची उणीधुणी काढत सत्तासंघर्ष तीव्र होणार असल्याची चर्चा होत आहे.

    हुपरी : हुपरी (ता.हातकणंगले) येथील नगरपालिकेतील सत्ताधारी गटाच्या उपनगराध्यक्ष भरतराव लठ्ठे ( Bharatrao Laththe) यांच्यावरील अविश्वास ठराव १४ विरुद्ध ० मतांनी मंजूर करण्यात आला. तर या सभेच्या अगोदरच मी स्वतःहून राजीनामा दिल्याने सदरची सभा बेकायदेशीर असून, फक्त मला बदनाम करण्यासाठी सत्ताधारी गटाचा खटाटोप चालू असल्याचा आरोप भरतराव लठ्ठे यांनी केला आहे.

    नगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे उपनगराध्यक्ष भरतराव लठ्ठे हे मनमानी कारभार करत असल्याचे कारण देत सत्ताधारी भाजपचे ६, कोल्हापूर ताराराणी आघाडीचे ५, शिवसेनेचा १ अशा १२ नगरसेवकांनी बुधवारी (ता.२०) रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता. या ठरावावर चर्चा करण्यासाठी नगराध्यक्षा जयश्री गाट यांनी आज खास ऑनलाइन सभेचे आयोजन केले होते.

    दरम्यान, आज सकाळी साडेअकरा वाजता ऑनलाइन सभेस नगराध्यक्षा जयश्री गाट यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभारी मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष भरतराव लठ्ठे यांच्यावर दाखल केलेल्या अविश्वास ठरावासाठी प्रभागवार नगरसेवकांचे मतदान घेण्यात आले. यामध्ये झालेल्या मतदानात १४ विरुद्ध ० मतांनी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा जयश्री गाट यांनी ठरावाच्या बाजूंनी मतदान केले तर उपनगराध्यक्ष भरतराव लठ्ठे यांनी पक्षासोबत राहत असल्याचे सांगत सदरची बेकायदेशीर सभा मला बदनाम करण्यासाठी घेतल्याचा आरोप केला आहे.

    यावेळी नगराध्यक्षा जयश्री गाट म्हणाल्या की, भरतराव लठ्ठे यांचा जेष्ठत्वचा मान राखून तीन वर्षापूर्वी उपनगराध्यक्ष व पक्षप्रतोद अशी दोन्ही पदे त्यांना दिलेली होती. परंतु सतत पक्षविरोधी भूमिका घेऊन सत्ताधारी गटाला अडचणीत आणण्याचे काम त्यांनी केल्यामुळे पक्षप्रतोद पद काढून घेण्यात आले होते. तसेच उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यासाठी पक्षाचे जेष्ठ नेते महावीर गाट यांच्यासह सर्वांनी प्रयत्न केले व पक्षाच्या विरोधात कुरघोडी चालूच ठेवल्या. त्यामुळे अविश्वास ठराव आणणे भाग पडले.

    उपनगराध्यक्ष भरतराव लठ्ठे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर सत्ताधारी भाजप-ताराराणी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करुन शहरातील चौका-चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

    सत्ता संघर्ष तीव्र होणार..?

    भाजपच्याच उपनगराध्यक्षावर अविश्वास मंजूर झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेला आनंदोत्सव चर्चेचा विषय बनला असून, यापुढे सत्ताधारी व विरोधात एकमेकांची उणीधुणी काढत सत्तासंघर्ष तीव्र होणार असल्याची चर्चा होत आहे.