प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अधिकारी नियुक्त करावेत : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने शहराच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. यशस्वी पाठपुरावा करून निधी मंजुर केला जात आहे. असे असताना मिळालेल्या निधीतून विकास कामे तातडीने होताना दिसत नाहीत. त्यामुळे निधी परत जाण्याची शक्यता निर्माण होते

  कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने शहराच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. यशस्वी पाठपुरावा करून निधी मंजुर केला जात आहे. असे असताना मिळालेल्या निधीतून विकास कामे तातडीने होताना दिसत नाहीत. त्यामुळे निधी परत जाण्याची शक्यता निर्माण होते, अशाने कोल्हापूर शहराचा विकास अधिकच खुंटणार असून, महानगरपालिका अधिकाऱ्यांनी कामाची क्षमता वाढवावी.

  मंजूर झालेले प्रकल्प पूर्ण करण्याकरिता प्रत्येक प्रकल्पाच्या नियोजनासाठी व देखरेखीसाठी स्वतंत्र प्रभारी प्रकल्प अधिकारी नियुक्त करावेत, अशा सुचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिल्या.

  कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनास विविध योजना व प्रकल्पांसाठी मंजूर  झालेल्या निधीसंदर्भात कोल्हापूर महानगरपालिका येथे आढावा बैठक पार पडली. यावेळी आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगेल, माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे, ऋतुराज क्षीरसागर, किशोर घाटगे, निलेश हंकारे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, कार्यकारी अभियंता हर्षजीत घाटगे, एन.एस.पाटील, संजय सरनाईक यांच्यासह इतर  विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

  कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्ग असणाऱ्या आखरी रास्ताचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. आपल्या व माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांच्या पाठपुराव्याने या रस्त्याचे अर्धे काम पूर्णत्वास आले आहे. उर्वरित रस्त्याचे काम आमदार निधीतून प्रस्तावित होणार होते. परंतु, आमदार कै.चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे या उर्वरित रस्त्याच्या कामाची प्रक्रिया पार पडलेली नाही. उर्वरित रस्त्याचे काम प्रशासनाने स्वनिधीतून तत्काळ करावे.

  – राजेश क्षीरसागर

  विविध कामे पूर्ण करण्याच्या सूचना

  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक व क्रीडा संकुलाचे काम तत्काळ सुरु करावे. ऐतिहासिक रंकाळा तलाव सुशोभिकरण आणि संवर्धन आराखड्यानुसार कामाच्या निविदा प्रसिद्ध कराव्यात. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजनेअंतर्गत नागरी दळणवळण साधनांचा विकास या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील रस्ते, गटर, भुयारी मार्ग व फुटपाथ करण्याच्या कामांना रु.२०३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु, त्याचाही प्रस्तावही प्रशासनाकडून सादर करण्यात आलेला नाही, याबाबत विचारणा करण्यात आली.