विरोधकांना मागच्या दाराने अमूलला मदत करायची असेल : सतेज पाटील

    कोल्हापूर : मागच्या दाराने अमूलला मदत करायची असेल; (महाडिकांचे नाव न घेता) म्हणूनच गोकुळच्या नवीन प्रकल्पांना विरोध केला जात आहे, असे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

    कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सह संघाची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ सभेला उपस्थित होते.

    सभेनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी गोकुळच्या भविष्यातील वाटचालीबाबत माहिती दिली. पुढल्या वेळी गोकुळची सर्वसाधारण सभा ऑफ लाईन घेऊन सभासदांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला आम्हाला आवडेल. भविष्यात गोकुळचे योग्य नियोजन करण्यासाठी नवीन प्रकल्पाला जागा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

    मुंबई ही गोकुळसाठी भविष्याची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रकल्प उभा राहिल्यास त्याचा गोकुळला चांगलाच फायदा होईल. यापूर्वी वासाच दूध राजकीयदृष्ट्या काढले जात होते, ते आता बंद झाले आहे, असे पाटील यांनी सांगितले. विरोधकांना मागच्या दाराने अमूलला मदत करायची असेल म्हणूनच गोकुळच्या नवीन प्रकल्पांना विरोध केला जात आहे.

    सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत विचारले असता, नामदार हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावरील आरोपांना यापूर्वीच उत्तरे दिली आहेत. त्यामुळे किरीट सोमय्यांनी कोल्हापूरला विनाकारण बदनाम करण्यासाठी येऊ नये. त्यांनी दौरा टाळावा, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले. नसेलतर सोमय्यांचा दौरा हाणून पाडू असा इशाराही देण्यात दिला.