एसटी कर्मचारी संपावर, प्रवाशांचे हालच हाल…

एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन करून संप पुकारल्यामुळे गडहिंग्लजमधील प्रवाशांचे अतोनात हाल झाले. विशेष करून विद्यार्थ्यांना याचा फटका बसला.

    गडहिंग्लज : एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन करून संप (ST Staff Strike in Kolhapur) पुकारल्यामुळे गडहिंग्लजमधील प्रवाशांचे अतोनात हाल झाले. विशेष करून विद्यार्थ्यांना याचा फटका बसला तर अन्य प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला, तर काहीजणांना पायपीट करावी लागली.

    शाळा-महाविद्यालये काही दिवसांपूर्वीच सुरू झाली आहेत. गडहिंग्लज शहरात सकाळच्या वेळी बहुतांशी मुक्कामास गेलेल्या गाडीतून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मुक्कामच्या बसने सकाळी विद्यार्थी दाखल झाले. पण महाविद्यालय सुटल्यानंतर एसटी बंद असल्यामुळे विद्यार्थी दुपारपर्यंत बसस्थानकावर थांबून होते. तसेच परगावी जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांनाही याचा चांगलाच फटका बसला.

    गडहिंग्लज एसटी कर्मचाऱ्यांनी बसस्थानकातच ठिय्या मांडून आंदोलन केले होते आणि आपल्या मागण्यांच्या घोषणांनी बसस्थानक परिसर दणाणून सोडला होता. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण झाले पाहिजे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता दिवाळीपूर्वी मिळाला पाहिजे, वाढीव घरभाडे ८,१६,२४ या दराने मिळाली पाहिजे, सर्व सण उचल १२, ५०० रु मिळाली पाहिजे, वार्षिक वेतनवाढ दोन टक्क्यांवरून तीन टक्क्यांवर मिळावी.

    न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ठरलेल्या तारखेस नियमित वेतन मिळावे आणि दिवाळी बोनस १५ हजार रुपये मिळावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीमार्फत हे आंदाेलन करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन बेमुदत सुरू राहणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या आंदोलनाला राजकीय नेतेमंडळींनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. आंदोलनात एमआय सनदी पांडुरंग सूर्यवंशी, गजानन विचारे, अरविंद पाटील, रणजीत रोकडे, सागर डोणुक्षे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.