कागलमध्ये केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत निदर्शने

  कागल : अखिल भारतीय किसान मोर्चाच्या वतीने केंद्र सरकारच्या प्रतिगामी कारभाराविरुद्ध सोमवारी ‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देत निषेध करून निदर्शने करण्यात आली.

  केंद्र शासनाने केलेल्या तीन नव्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी, शिवराज मंच, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी पाठिंबा दिला. संयुक्त किसान कामगार मोर्चातर्फे सोमवारी भारत बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीयांच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधी प्रचंड घोषणाबाजी करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली.

  यावेळी केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा भाजप सोडून सर्वपक्षीयांच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. यावेळी महाविकासआघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवराज मंच आदी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

  काळे झेंडे दाखवत केंद्राचा निषेेध

  दिल्ली येथे शेतकऱ्यां विरोधी केलेल्या तीन कायद्याच्या विरोधात गेले वर्षभर आंदोलन सुरू आहे. या कायद्याच्या विरोधात अखिल भारतीय किसान मोर्चाच्या वतीने भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महा विकास आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवराज मंच या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात काळे झेंडे दाखवत केंद्र शासनाचा निषेध करत निदर्शने केली.

  याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने म्हणाले, मी म्हणेल तीच पूर्वदिशा ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची हिटलरशाही आहे. गेले वर्षभर दिल्लीत शेतकरी पावसाळा थंडी, उन्हाचे चटके सोसत आंदोलन करीत आहेत. त्यांची मागणी आहे शेतकरी विरोधातील कायदे मागे घ्यावेत आणि याबाबत चर्चा करावी. परंतु केंद्र शासन मुर्दाड पणे शेतकर्‍यांच्या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. यासाठी भारतवासियांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन भैय्या माने यांनी केले.

  पंतप्रधान मोदी आंदोलकांकडे फिरकलेही नाहीत

  माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर म्हणाले, दिल्लीत सुरू असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी फिरकलेही नाहीत. मात्र, उद्योगपती अदानी आणि अंबानी यांच्यासाठी त्याना वेळ आहे. मात्र, आंदोलकांना भेटायला त्यांना वेळ मिळत नाही. हे दुर्दैव आहे.

  यावेळी ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संजय चितारी, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, पक्षप्रतोद नितीन दिंडे, नगरसेवक प्रविण काळबर, सतीश घाडगे, आनंदा पसारे, कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेस अंल्पसंख्यांक अध्यक्ष पंकज खलिफ यांच्यासह इतर अनेक उपस्थित होते.