राजर्षी शाहू महाराजांची जयंती राधानगरी धरणावरच साजरी करणार : समरजितसिंह घाटगे

    कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांची जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करून राज्याबरोबरच संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेण्यासाठी व त्यांचे कार्य देशभरात पोहोचवण्यासाठी येत्या २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराजांची जयंती राधानगरी धरणावरच साजरी करणार असल्याचे समरजितसिंह घाटगे यांनी जाहीर केले. फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत त्यांनी हा निर्णय जाहीर केला.

    शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्याची व्यवस्था नसेल तर शेतकऱ्यांचा विकास होणार नाही म्हणून शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हरितक्रांतीचे स्वप्न नजरेसमोर ठेवून राधानगरी धरणाची निर्मिती राजर्षी शाहू महाराज व पिराजीराव घाटगे महाराज यांनी पाहिले व ते सत्यात उतरवले. इंग्रजांनी या धरणाच्या निर्मितीसाठी आर्थिक मदत करण्यास नकार दिला असतानाही स्वतःच्या तिजोरीतून या धरणाची निर्मिती केली की ज्या धरणातून आज एक थेंब पाण्याची गळती होत नाही.

    सध्याच्या सामाजिक व राजकीय वातावरणामध्ये एका समाजाला दुसऱ्या समाजाविषयी तेढ निर्माण झाला आहे. वातावरण तंग झालेले आहे. अशावेळी सर्व समाजांना या धरणावर एकत्र करून सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्नही या जन्मोत्सवाच्या माध्यमातून केला जाणार आहे.

    राजर्षी शाहू महाराजांच्या कृतीच्या स्थानातून त्यांनी पाहिलेले स्वप्न पुनरुज्जीवित करण्यासाठी हा प्रयत्न असणार आहे. राधानगरी धरणाच्या निर्मितीमध्ये ज्यांचे योगदान आहे, ज्यांनी जमिनी दिल्या त्यांच्या हस्ते जलपूजन करून जलाभिषेक केला जाणार आहे. कोराेनाच्या पार्श्वभूमीवर हा जन्मोत्सव कार्यक्रम मर्यादित लोकांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार असून, त्याचे फेसबुकवरून प्रक्षेपण केले जाणार आहे.