इचलकरंजीत कुख्यात टोळीकडून खंडणीचा तगादा; व्हॉट्सऍपवर ‘ते’ स्टेट्स ठेवत केली आत्महत्या

एका कुख्यात टोळीकडून होणाऱ्या खंडणीच्या मागणीमुळे एका तरुणाने आत्महत्या (Suicide in Ichalkaranji) केली. मृत तरुण हा जवाहरनगर भागातील आहे. या तरुणाकडून त्या टोळीने खंडणी म्हणून काही रक्कम व सोन्याची अंगठी घेतली.

    इचलकरंजी : एका कुख्यात टोळीकडून होणाऱ्या खंडणीच्या मागणीमुळे एका तरुणाने आत्महत्या (Suicide in Ichalkaranji) केली. मृत तरुण हा जवाहरनगर भागातील आहे. या तरुणाकडून त्या टोळीने खंडणी म्हणून काही रक्कम व सोन्याची अंगठी घेतली. तसेच तरुणाच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. या त्रासाला व वारंवार होणाऱ्या खंडणीच्या मागणीला कंटाळून आत्महत्या केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली त्या टोळीचा नावाची चिठ्ठी पोलिसांना मिळाली.
    पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, जवाहरनगर भागात अनेक वर्षांपासून एक टोळी आपले साम्राज्य पसरू पाहत आहे. टोळीतील अल्पवयीनसह तरुण गंभीर गुन्ह्यातील सक्रिय आहे. टोळीवर खंडणी  मागण्यांपासून ते गुन्ह्यातील गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी जवाहरनगर भागातील एका तरुणाला या टोळीकडून खंडणी मागण्याचा त्रास सुरू झाला. या त्रासाने काही दिवसांपूर्वी तरूणाने या टोळीला 25 हजार व सोन्याची अंगठी दिली. मात्र, पुन्हा खंडणीसाठी  टोळीकडून त्रास सुरूच राहिला.
    तरुणाने खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर टोळीने कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने चिठ्ठी लिहून त्या टोळीचा उल्लेख केला आहे. तसेच या चिठ्ठीचा व्हॉट्सऍप स्टेट्सही (WhatsApp Status) तरुणाने ठेवल्याचे समजते.