आरक्षणप्रश्नी भाजप खुल्या चर्चेस तयार, मंत्री मुश्रीफांनी तारीख आणि वेळ ठरवावी

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, सरचिटणीस विजय जाधव, अशोक देसाई यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी जिल्हयातील लसीकरणाचा पोलखोल केला. जिल्ह्यातील वाढत्या कोरोना स्थितीला तीन मंत्र्यासह जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला.

  कोल्हापूर : पुणे, नाशिक, जालना जिल्ह्यातील सत्ताधारी आघाडीच्या मंत्र्यांनी आपआपल्या जिल्ह्यात मुबलक प्रमाणात लस उपलब्ध केली. त्या जिल्ह्यात मोठया संख्येने लसीकरण होवून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. याउलट स्थिती कोल्हापुरात आहे. कोरोना स्थिती हाताळण्यात कोल्हापूर जिल्ह्यातील तीनही मंत्री कुचकामी ठरले आहेत. मंत्री महोदयांनी व प्रशासनांनी येत्या दहा दिवसात जिल्ह्यासाठी मोठया संख्येने लस उपलब्ध करुन लसीकरण केले नाही, कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणली नाही तर मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करू’ असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

  पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, सरचिटणीस विजय जाधव, अशोक देसाई यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी जिल्हयातील लसीकरणाचा पोलखोल केला. जिल्ह्यातील वाढत्या कोरोना स्थितीला तीन मंत्र्यासह जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला.

  महेश जाधव म्हणाले, ‘जिल्ह्यातील मंत्री स्वतला ताकतवर नेते समजतात. मात्र या मंत्र्यांना केंद्राकडून राज्याला उपलब्ध झालेली लस कोल्हापूरला आणता आली नाही. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे जिल्हयाच्या राजकारणात शंभर किलो राजकीय वजन असल्याचा टेंभा मिरवतात. मात्र त्यांचे राज्य पातळीवरील राजकारणात पावशेरही राजकीय वजन भरत नाही.’

  जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले,‘जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे हाहाकार उडाल्यासारखी स्थिती आहे. मात्र जिल्ह्यातील तीनही मंत्री त्या प्रश्नाशी काही देणेघेणे नाही असे वागत आहेत. त्यांच्या नाकर्तेपणामुळे आरोग्य सुविधेचा बोजवारा उडाला आहे. आठवडाभरात सध्य स्थितीत फरक पडला नाही तर भारतीय जनता पक्ष हा एक जबाबदार विरोधी पक्ष या नात्याने याप्रश्नी सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडू.’

  सरचिटणीस विजय जाधव म्हणाले,‘ केंद्राकडून राज्य सरकारला मुबलक स्वरुपात लस उपलब्ध झाली आहे. मात्र कोल्हापुरात लसीचा तुटवडा जाणवत आहे. कोल्हापूरसाठी लस उपलब्ध न होणे यावरुन जिल्ह्यातील मंत्र्यांचे राजकीय वजन किती आहे हे दिसून  येते.

  अशोक देसाई म्हणाले, ‘आपत्तकालीन व्यवस्थापन विभागाची यंत्रणा शहर आणि जिल्ह्यात कुठेही नजरेस पडत नाही. प्रशासकीय पातळीवर सावळागोंधळ आहे. ’ पत्रकार परिषदेला हेमंत आराध्ये,दिलीप मैत्राणी उपस्थित होते.

  शहरात केवळ आठ टक्के लसीकरण

  माजी नगरसेवक अजित ठाणेकर म्हणाले, ‘गेल्या सहा महिन्याच्या लसीकरणानंतर शहराच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ आठ टक्के लसीकरण पूर्ण होत असेल तर ही स्थिती भयावह आहे. जिल्ह्यातील एकूण १० लाख ४० हजार ४२ नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. दोन लाख ७६ हजार १५३ नागरिकांना दुसरा डोस मिळाला. यापैकी शहरातील केवळ एक लाख ७५ हजार १८७ इतक्या नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यापैकी एक लाख २५ हजार ३१४ नागरिकांना पहिला डोस तर ४९ हजार ८७३ नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे. ही आकडेवारी २७ जूनपर्यंतची आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणात लसीचे दोन्ही डोस मिळाल्याशिवाय ती व्यक्ती सुरक्षित होत नाही.’

  बिंदू चौकात येण्याचे जाहीर आव्हान 

  मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन सध्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेते मंडळीत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. एकमेकांना जाहीर चर्चेचे आव्हान देत आहेत. याप्रश्नावर बोलताना महेश जाधव म्हणाले, ‘आरक्षणप्रश्नी चर्चा करायला भाजपचे नेते तयार आहेत. पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना आणण्याची जबाबदारी आमची आहे. मंत्री मुश्रीफांनी तारीख आणि वेळ ठरवावी. तसेच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना उपस्थित ठेवावे.दूध का दूध,पानी का पानी होऊ दे. ’