सतेज पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची फसवणूक केली – राजू शेट्टी

जिल्हा बँकेत स्वाभिमानीला एक जागा देतो असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करताना दिल होते. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. आयत्या वेळी जर आमच्या पाठीत खंजीर खुपसला तर तो खंजीर उलटा फिरवायला वेळ लागणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिला आहे.

    कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरुन कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. जिल्हा बँकेत स्वाभिमानीला एक जागा देतो असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करताना दिल होते. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. आयत्या वेळी जर आमच्या पाठीत खंजीर खुपसला तर तो खंजीर उलटा फिरवायला वेळ लागणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिला आहे.
    या बँकेच्या निवडणुकीवरुन पालकमंत्री सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हे आमने सामने येण्याची शक्यता आहे.
    सतेज पाटील यांनी आता, शिरोळची जागा बिनविरोध करण्यासाठी स्वीकृतचा पर्याय दिला आहे. मात्र, शिरोळमधील उमेदवार काँग्रेस आणि शिवसेनेचे आहेत. त्यामुळे सतेज पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची फसवणूक केली असल्याचा आरोप शेट्टींनी केलाय. याबाबत उद्या दुपारपर्यंत आमचा निर्णय सांगू असे शेट्टींनी स्पष्ट केले आहे.
    स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी म्हणाले की, ‘कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत स्वाभिमानीला एक जागा देतो, असे आश्वासन सतेज पाटील यांनी विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करताना दिले होते. आता शिरोळची जागा बिनविरोध करण्यासाठी त्यांनी स्वीकृतचा पर्याय दिला आहे. सतेज पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत विश्वासघात केला. आयत्या वेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, आता तो खंजीर उलटा फिरवायला वेळ लागणार नाही.’
    दरम्यान, कोल्हापूर विधान परिषद मतदारसंघातून आमदारपदी बिनविरोध निवडून आल्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक म्हणूनही सतेज पाटील यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांनी गगनबावडा विकास सेवा संस्था गटातून अर्ज दाखल केला. या गटातून विरोधी आघाडीने अर्ज दाखल न केल्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडणूक निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.