कोल्हापूर आरटीओ कार्यालयात सव्वा कोटीचा गैरव्यवहार

    कोल्हापूर : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात संगनमताने एक कोटी २३ लाख ३७ हजारांचा कर शासनाच्या तिजोरीत जमा न करता परस्पर हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतची चौकशी करण्याचे काम सुरू असून, त्याचा अहवाल राज्य परिवहन आयुक्तांना पाठवणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांनी सांगितले.

    जर वाहनाचे विक्रेते अथवा कर्मचारी यामध्ये दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये गेल्या पाच वर्षांत ६१३ वाहनांच्या किंमती कमी दाखवून एक कोटी २३ लाख ३७ हजार रुपयांचा कर शासनाच्या तिजोरीत जमा केला नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवीन वाहनांची नोंदणी करताना अनियमितता झाल्याची बाब निदर्शनास आली. या प्रकारामुळे कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे धाबे दणाणले आहेत.

    याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस म्हणाले, वाहनांची खरेदी होत असताना ती एकाच महिन्यात होत नाही. त्यामुळे वाहनांच्या किंमतीमध्ये तफावत असू शकते. याशिवाय वाहनांच्या रंगात बदल झाल्यास त्या वाहनांच्या किंमती कमी-जास्त असू शकतात. साधारणपणे वाहनांच्या किंमतींवर १० ते १६ टक्क्यांपर्यंत कर आकारला जातो. त्यामुळे ज्या ६१३ वाहनांच्या किंमतीवर ठपका ठेवण्यात आला आहे. त्याची तपासणी करण्यात येत आहे. त्याचा चौकशी अहवाल येत्या आठ दिवसांमध्ये राज्य परिवहन आयुक्तांना देण्यात येणार आहे.

    वाहनाचे विक्रेते अथवा कर्मचारी यामध्ये दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. अल्वारिस यांनी स्पष्ट केले. दरम्यानस, ज्या ६१३ वाहनांच्या खरेदीवर ठपका ठेवण्यात आला आहे, ती सर्व वाहने कोल्हापूर जिल्ह्यातील असून, सर्वच वाहने चारचाकी असल्याचही डॉ अल्वारीस यांनी सांगितले.