शरद पवार राज्य सरकारवर अंकुश ठेवायला कमी पडले : चंद्रकांत पाटील

भाजपचे सरकार केवळ दोन वेळा सत्तेत होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन ते टिकवले. सत्तेतील ज्या त्या जातींच्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या जातींना न्याय मिळवून दिला. मराठा समाजातील नेत्यांनी केले नाही.

    कोल्हापूर : टनादुरुस्तीने राज्याचे अधिकार काढून घेतले असे ज्येष्ठ नेते शरद पवार सांगतात. माञ तेच राज्य सरकारवर अंकुश ठेवायला कमी पडले. आणि महाराष्ट्राचे नुकसान झाले, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. शासकीय जागांवर महाविद्यालये उभारुन परराज्यातील विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी शुल्क वसूल करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांना मराठा समाजातील मुलांची चिंता आता कशी पडली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

    चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपचे सरकार केवळ दोन वेळा सत्तेत होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन ते टिकवले. सत्तेतील ज्या त्या जातींच्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या जातींना न्याय मिळवून दिला. मराठा समाजातील नेत्यांनी केले नाही. बँका, पतसंस्था, कारखान्यांत त्यांची सत्ता असताना त्यांनी सेल्फ डिक्लेअर रिझर्व्हेशन म्हणून किती मराठा तरुणांना मेरीटवर नोकरीत सामावून घेतले? शरद पवार, अजित पवार, अशोक चव्हाण, पतंगराव कदम यांनी मराठा समाजासाठी काय केले? मराठा समाजातील नेत्यांच्या गाड्यांमागे हे तरुण केवळ ‘जिंदाबाद, जिंदाबाद’ म्हणून घोषणा देत राहिले. या नेत्यांनी एकदा त्यांची प्रॉपर्टी जाहीर करावी असेही म्हणाले.साध्या स्कूटरवरून फिरणाऱ्या जिल्ह्यातील नेत्यांनी शासकीय जागा घेऊन महाविद्यालय बांधली. हरियाणा, पंजाब, जम्मू कश्मीर येथील विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी शुल्क आकारून प्रवेश दिला. त्यावेळी त्यांना मराठा विद्यार्थ्यांच ‘चिंता का दिसली नाही ? असा सवालही त्यांनी केला.