…म्हणून ‘स्वाभिमानी’ने घातलं महाविकास आघाडी सरकारचं बारावं; मुंडणही केलं

स्वाभिमानीच्या ठिय्या आंदोलनाला १२ दिवस होत असून, राज्य सरकारचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं महाविकास आघाडी सरकारचं बारावं घालण्यात आलं. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असूनही त्याची दखल घेतली जात नाही. हे सरकार आमच्या दृष्टीने मेलेले आहे.

    कोल्हापूर : स्वाभिमानीच्या ठिय्या आंदोलनाला १२ दिवस होत असून, राज्य सरकारचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं महाविकास आघाडी सरकारचं बारावं घालण्यात आलं. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असूनही त्याची दखल घेतली जात नाही. हे सरकार आमच्या दृष्टीने मेलेले आहे, म्हणूनच आज या सरकारचं बारावं घालण्यात आल्याचं माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी म्हटलंय. यावेळी कार्यकर्त्यांनी मुंडन करून घेत, महाविकास आघाडी सरकारच्या नावाने शंखध्वनी केला.

    शेतीला दिवसा १० तास वीज द्या, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापूर येथील वीज महावितरण कार्यालयासमोर ठिय्या मारून बसली आहे. आंदोलनाला आज १२ दिवस पूर्ण होत आहेत. मात्र, सरकारकडून बैठकीचे केवळ आश्वासन दिले जात आहे. या आंदोलनाची दखल सरकारने अद्यापही घेतलेली नाही. परिणामी, हे सरकार मृतावस्थेत असून, सरकारचा निषेध म्हणून आज गोडधोड जेवणासह मुंडन करत, महाविकास आघाडी सरकारच बारावं घालण्यात आलं. यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आपलं मुंडण करून घेत सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

    यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी, राज्य सरकारकडून बैठकीसाठी तारीख पे तारीख दिली जात आहे. मात्र ठोस कारवाई केली जात नाही. हे सरकार आमच्या दृष्टीने मृत्यूमुखी पडले आहे. म्हणूनच विधिवत पूजा करून सरकारचं बारावं घालण्यात आल्याचं त्यानी सांगितलं. तर उद्यापासून हे आंदोलन अधिक तीव्र केले जाणार असून, राज्यभर याचे पडसाद उमटतील, असा इशारा यावेळी शेट्टी यांनी दिला आहे.