वारणेची तात्यासाहेब कोरे फार्मसी देशात अव्वल : विनय कोरे

कोल्हापूर-सांगली-सातारा जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या २८८ कॉलेजपैकी केवळ दोनच फार्मसी कॉलेजचा समावेश असल्याची माहिती वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  वारणानगर : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘नॅशनल इन्स्टिटयूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क (निर्फ)’ म्हणजे ‘राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी २०२१’ मध्ये वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीने ७६ ते १०० रॅंक बॅण्ड म्हणजेच देशातील पहिल्या १०० महाविद्यालयामध्ये तिसऱ्यांदा मानाचे स्थान पटकावले.
  कोल्हापूर-सांगली-सातारा जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या २८८ कॉलेजपैकी केवळ दोनच फार्मसी कॉलेजचा समावेश असल्याची माहिती वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  डॉ. कोरे म्हणाले, अध्यापनासाठी आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता, आर्थिक विश्वसनियता; महाविद्यालयातील संशोधनाची संशोधनपर लेख आणि बौद्धिक संपदा यातून सिद्ध झालेली गुणवत्ता; महाविद्यालयात राबवलेले सक्षमता विकास उपक्रम; नोकरी-व्यवसाय करण्यात तसेच उच्चशिक्षण घेण्यात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संपादित केलेले यश; सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांसाठी उपलब्ध संसाधने; आणि महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या पदवीधरांच्या गुणवत्तेबाबतीत संबंधित उद्योग-व्यवसाय देशातील नावाजलेल्या संस्था आणि शिक्षणतज्ञांचे असलेले मत या निर्देशकांवर आधारित हे रॅंकिंग आहे.

  त्रि-सूत्रीच्या जोरावर समग्र विकास

  विद्यार्थ्यांची पटसंख्या, आर्थिक जमा-खर्च आणि शिक्षकांची नावे इतकीच माहिती महाविद्यालयाकडून घेतली जाते. इतर सर्व माहिती स्वतंत्र एजन्सीद्वारे गोळा केली जात असल्याने निर्फ रॅकिंगला शिक्षण क्षेत्रात विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
  निर्फ रॅंकिंग मध्ये तिसऱ्यांदा स्थान पटकावून खऱ्या अर्थाने फार्मसी अभासक्रमातील दर्जेदार शिक्षण देणारं महाविद्यालय असल्याचे तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीने सिद्ध केलं आहे. ज्ञानदानाच्या सर्वोत्कृष्ट पद्धती, गुणवत्तापूर्ण संशोधन, आणि सामाजिक कार्यात सहभाग या त्री-सूत्रीच्या जोरावर विद्यार्थ्यांचा समग्र विकास साधण्याचा महाविद्यालय सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा मला आज विशेष आनंद आहे, असे आमदार काेरे म्हणाले.