प्राथमिक शाळेतील शिक्षिका कोरोना पॉझिटिव्ह; विद्यार्थ्यांसह शिक्षक चिंतेत

निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील प्राथमिक शाळेतील एक शिक्षिका कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली. या शिक्षकेसह शिरोळ तालुक्यात ६ जण पॉझिटिव्ह आढळले असून, निमशिरगाव येथील विद्यार्थी व शिक्षक अशी ४० जणांचे स्वॅब तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.

    कुरुंदवाड : निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील प्राथमिक शाळेतील एक शिक्षिका कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली. या शिक्षकेसह शिरोळ तालुक्यात ६ जण पॉझिटिव्ह आढळले असून, निमशिरगाव येथील विद्यार्थी व शिक्षक अशी ४० जणांचे स्वॅब तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.

    दरम्यान, शिरोळ तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, निमशिरगाव येथील प्राथमिक शाळेची इमारत सॅनिटाइज करण्यासाठी शाळा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

    दानोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी कार्यरत ठेवण्यात आले आहेत. शनिवारी गटशिक्षणाधिकारी दीपक कामत व आरोग्याधिकारी डॉ. पी. एस. पाखरे यांनी निमशिरगाव येथील प्राथमिक शाळेस भेट देऊन आरोग्य पथकास दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

    शुक्रवारी दुपारी निमशिरगाव येथील प्राथमिक शिक्षिका अचानक ताप येऊन तब्येत बिघडल्याने त्या घरी गेल्या. तेथून त्यांचा स्वॅब तपासण्यात आल्यानंतर त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आज आला आहे.

    याबाबत शालेय शिक्षण समिती व आरोग्य पथकाने योग्य ती काळजी घेतली असून, त्या वर्गातील २२ व १३ शिक्षक इतर ५ असे एकूण ४० जणांचे स्वॅब घेण्यात आले असून, तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

    या अहवालानंतरच किती जणांना लागण झाली हे प्रत्यक्षात समजून येणार असून, त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. या कोरोना पॉझिटिव्ह शिक्षिकेसह तालुक्यात शनिवारी अखेर ६ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एस. पाखरे यांनी सांगितले.

    कोरोनाला प्रतिबंध बसावा, त्याचा प्रसार झपाट्याने होऊ नये याकरिता दानोळी प्राथमिक आरोग्य केंद्रास सर्व शिरोळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. योग्य ती खबरदारी घेण्याचे कळविण्यात आले आहे. तालुक्यातील जनतेने विना मास्क फिरू नये. वारंवार सॅनिटायझर लावून, साबणाने हात धुवावे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. शासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. पाखरे यांनी केले.

    कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी व कोरोनाला प्रतिबंध करणारे सर्व उपाययोजना कराव्यात अशा सूचना दिल्या आहेत.

    दीपक कामत, शिक्षणाधिकारी, शिरोळ पंचायत समिती.