मंडळाचा कार्यकर्ताच निघाला चोरटा

कोल्हापूरातील राजाराम चौक तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीच्या अंगावरील दागिने मंडळाच्या कार्यकर्त्याने चोरी केले होते हे पोलिस तपासात उघड झाले आहे.

    कोल्हापूर : कोल्हापूरातील राजाराम चौक तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीच्या अंगावरील दागिने मंडळाच्या कार्यकर्त्याने चोरी केले होते हे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी सुयश उर्फ वरुण महेश हुक्केरी (वय १९ रा. राजाराम चौक) याला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन चांदीचे कंडे, चार अंगठ्या, असा १३८१ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने जप्त केले.

    पहाटेच्या सुमारास मारला डल्ला

    स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली. १५ सप्टेंबर रोजी पहाटे तीन ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास राजाराम चौकातील राजाराम चौक तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीचे दागिने चोरीस गेले. यावेळी मंडपात काही कार्यकर्ते झोपले होते. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात मूर्तीच्या अंगावरील चार अंगठ्या, दोन कंडे चोरीस गेल्याची फिर्याद दिली.

    चाैकशीत दागिने चोरीची कबुली

    या गुन्हाचा तपास करताना पोलिसांना सुयश हुक्केरीने दागिने चोरल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दागिने चोरल्याची कबुली दिली. चोरलेले दागिने कदम खणीजवळील योगेश रामचंद्र पाटील यांच्याकडे ठेवायला दिले होते. पोलिसांनी चोरीचे चांदीचे दागिने जप्त केले. पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अजय गोडबोले, हेड कॉन्स्टेबल विजय कारंडे, पांडुरंग पाटील, किरण गावडे, कुमार पोतदार, प्रदीप पोवार, रवी पाटील यांनी तपासात परिश्रम घेतले.