कुरुंदवाड नगर पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील लोकांना केले भूखंड वाटप

शहरातील बहुचर्चित बेकायदेशीर भूखंड वाटपाचा चेंडू आता जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात कृती समितीने दाखल केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

    कुरुंदवाड : कुरुंदवाड नगर पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील लोकांना नाममात्र किमतीत पालिकेच्या मालकीचे भूखंड दिले असून, याची चौकशी होऊन त्यांच्यावर मुन्सिपल ऍक्ट १६ नुसार कारवाई करून संबंधितांना बडतर्फ करावे व त्यांना अपात्र करुन ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालावी, अशा आशयाचा दावा कुरूंदवाड शहर बचाव कृती समितीने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात दाखल केला.
    शहरातील बहुचर्चित बेकायदेशीर भूखंड वाटपाचा चेंडू आता जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात कृती समितीने दाखल केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील सत्ताधारी मंडळींनी आपल्या मर्जीतील लोकांना खूश करण्यासाठी बेमालूमपणे भूखंडाचे कवडीमोल भावाने वाटप केले आहे. ४१ भूखंडाचे प्लॉट वाटप केले असून, ३२ लोकांची यादी कृती समितीला दिली आहे. मात्र, उर्वरित ९ लोकांची यादी जारी न करण्यामागे कोणता गौडबंगाल आहे, असा सवाल कृती समितीने उपस्थित केला.
    भूखंडाबाबत कृती समितीने पदाधिकारी यांना जाब विचारल्यास नगरसेवक हाताची घडी तोंडावर बोट अशा परिस्थितीत माहिती न देण्यात टाळाटाळ करत आहेत. याचिकाकर्ते सुनिल कुरुंदवाडे, अर्शद बागवान, रियाज शेख यांच्याशी संपर्क साधला असता, शहरातील आरक्षित जागा असताना स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी संगनमताने शहरातील भूखंड ठराविक मर्जीतील लोकांना लाखो रुपये किंमतीचे भूखंड नाममात्र दरात वाटप करुन सत्ताधारी, पुढारी स्वत:चीच पाठ थोपटून घेत आहेत.