खोचीत संशयास्पद आढळला सहा वर्षीय मुलीचा मृतदेह; लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय

संबंधित बालिकेचे तालीम संघ गजानन मंडळाशेजारी घर आहे. मुलीची आई आज सकाळी शेतात कामासाठी गेली होती. वडील घरात होते. त्यांनी मुलगी जेवली नसल्याने सकाळी अकरा वाजता शोधाशोध सुरू केली.

  पेठ वडगांव : खोची (ता.हातकणंगले) येथील पाच तास गायब असलेल्या सहा वर्षीय मुलीचा गावालगतच्या जुन्या मुस्लिम दफनभुमीत मृतदेह आढळून आला. तिच्या चेहऱ्यासह अंगा, पायावर जखमेच्या खुना होत्या. त्यामुळे मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारल्याचा संशय व्यक्त होत आहे.

  याप्रकरणी एका संशयित तरुणास वडगाव पोलिसांनी अटक केली आहे. संशयित तरूण प्रदीप दिलीप पोवार (वय २७) याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे जयसिंगपूर पोलिस उपविभागीय अधिकारी रामेश्वर वैंजणे यांनी सांगितले. मुलीचा निर्जनस्थळी झाडीत मृतदेह आढळल्याने घातपात की अत्याचार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. याप्रकरणी मुलीच्या आई-वडिलांनी पेठवडगाव पोलिसात फिर्याद दिली आहे.

  घटनास्थळी अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड, तिरूपती काकडे, पोलिस उपअधीक्षक रामेश्वर वैंजणे, पोलिस निरीक्षक के. एन. पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, सायबर सेलचे शिशिराज पाठोळे यांनी भेट देऊन पाहणी व तपासासाठी मार्गदर्शन केले. घटनास्थळी मोठा जमाव जमल्याने मोठा पोलिस फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता. तसेच संशयिताच्या घराजवळ पोलिसांनी कडक पहारा ठेवला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आला आहे.

  याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संबंधित बालिकेचे तालीम संघ गजानन मंडळाशेजारी घर आहे. मुलीची आई आज सकाळी शेतात कामासाठी गेली होती. वडील घरात होते. त्यांनी मुलगी जेवली नसल्याने सकाळी अकरा वाजता शोधाशोध सुरू केली. त्यानंतर दुपारी बारा वाजता आई शेतातून घरी आल्यानंतर आईने, गल्लीतील युवकांनी व काही महिलांनी गल्लीत, परिसरामध्ये, नदीकाठी, शेतात, खोची बंधाऱ्याजवळ तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दुपारी पावणे चार वाजता येथील गावच्या पश्चिमेला प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या मुस्लिम समाजाच्या जुन्या दफनभुमीत एका झाडाखाली तिचा मृतदेह काही तरुणांना आढळून आला.

  याबाबत तात्काळ पेठवडगाव पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली. पेठवडगाव पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती सुर्यवंशी व पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला होता. पोलिसांनी जमावाला पांगवून घटनास्थळी पंचनामा केला. मुलीच्या मृत्यूची बातमी वडिलांना समजताच घटनास्थळी वडिलांचा आक्रोश हृदय पिटाळून टाकण्यासारखा होता. गावामध्ये प्रथमच अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडल्यामुळे ग्रामस्थांतून मोठा संताप व व्यक्त हळहळ व्यक्त होत आहे. संशयित युवकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

  पेठवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रथमच अशी घटना घडल्याने पेठवडगाव, हातकणंगले पोलिस ठाणे, दंगल नियंत्रण पथक, 50 हुन अधिक पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी होता. पोलिस उपअधिक्षक रामेश्वर वैंजणे, सरपंच जगदीश पाटील यांनी ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले.