रेल्वे वसाहत मुख्य बाजारपेठेपासून विभक्त; गेल्या दोन वर्षांपासून कायमस्वरुपी बंद

कुर्डुवाडी शहराच्या मध्यवर्ती बार्शीरोड बालोद्यान चौकात असणारे रेल्वेचे गेट नंबर ३८ हे गेल्या दोन वर्षापासून कायमस्वरुपी बंद असल्याने शहराचा आर्थिक कणा असणारी रेल्वे वसाहत शहराच्या मुख्य बाजारपेठेपासून विभक्त झाल्यामुळे बाजरपेठतील व्यावसायिकांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.

  कुर्डुवाडी : कुर्डुवाडी शहराच्या मध्यवर्ती बार्शीरोड बालोद्यान चौकात असणारे रेल्वेचे गेट नंबर ३८ हे गेल्या दोन वर्षापासून कायमस्वरुपी बंद असल्याने शहराचा आर्थिक कणा असणारी रेल्वे वसाहत शहराच्या मुख्य बाजारपेठेपासून विभक्त झाल्यामुळे बाजरपेठतील व्यावसायिकांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.  नगरपालिका प्रशासनाने रेल्वे गेट क्र ३८ चा प्रश्न तब्बल १३ वर्षे बासनात बांधून ठेवल्यामुळे अखेर रेल्वे प्रशासनाने (दि.२) ऑगस्टच्या २०१९ च्या मध्यरात्रीपासून रेल्वे गेट कायमचे बंद केले आहे. यामुळे कुर्डुवाडी शहराची विभागणी होऊन दोन भाग निर्माण झाले आहेत.

  नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो

  गेटच्या पलीकडे रेल्वे वसाहत असून या भागात नगरपालिकेच्या आठ प्रभागापैकी चार प्रभाग आहेत. याचाच अर्थ असा की शहराच्या लोकसंख्येपैकी अर्धी लोकसंख्या त्याबाजूस आहे. तर दुसऱ्या भागात शहराची मुख्य बाजारपेठ आहे. नगरपालिका,पंचायत समिती, प्रांतकार्यालय,पोलिस ठाणे, सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये बँका, दवाखाने, भाजी मंडई आहेत. परंतु गेटमुळे शहराची विभागणी झाली परिणामी नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  मुख्य बाजारपेठेत यायचे झाल्यास शहराच्या बाह्यवळण रस्त्याचा वापर करावा लागतो त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्हीही खर्च होत आहे. केवळ राजकीय उदासीनतेमुळे आज हे चित्र दिसत आहे.

  राजकीय उदासीनता

  दरम्यान गेल्या दीड वर्षात कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटली. याकाळात गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने शहरातील भाजी विक्रेत्यांना एकाच ठिकाणी बसून भाजी विकण्यास मज्जाव केला आणि शहरातील विविध भागात या विक्रेत्यांची विभागणी केली. त्यामुळे रेल्वे गेटच्या पलिकडे जाऊन भाजी व्यावसायिक  व्यवसाय करु लागले. तेथील रहिवास्यांनाही ते सोयीचे झाले. याशिवाय या बंदकाळात बेकरी, किराणा या व्यवसायांना परवानगी असल्याने अनेकांनी संधीचा पुरेपर उपयोग करत व्यवसायात बदल करत किराणा, बेकरी,दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, फुटवेअर, कापड दुकान, बुकस्टाॅल,अनेक जीवनावश्यक उद्योग या भागात थाटले आहेत. याभागात काही मिळत नाही असे नाही. त्यामुळे येथील नागरिकांची मोठी सोय झाली. कोविडच्या या निर्बंधामुळे अनेकांना व्यवसायाची ही नवी संधी मिळाली. व्यावसायिकांनीही ग्राहकांची गरज आणि संधी ओळखून निर्बंध उठल्यानंतरही आपले हे व्यवसाय याठिकाणी चालूच ठेवले.

  मुख्य बाजारपेठेवर परिणाम

  ता रेल्वे गेटपलिकडील नागरिकांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी बाजारपेठेत यावे लागत होते ते आता बंद झाले. गेटमुळे शहराचे जे विभाजन झाले त्यामुळे मुख्य बाजारपेठेवर नक्कीच परिणाम झाला असल्याचे दिसत आहे. तर गेट व कोरोनामुळे मिळालेल्या संधीचा या भागातील नागरिकांनी पुरेपर फायदा घेत बाजारपेठेतील व्यावसायिकांची मक्तेदारीही मोडीत काढली. नव्याने बाजारपेठ याठिकाणी विकसित होत आहे. भविष्यात याठिकाणी मोठ्या बँका आल्या की मुख्य बाजारपेठेला फारसे महत्व राहणार नाही. तरी वेळीच लोकप्रतिनिधींना जाग आली नाही तर भविष्यात यापेक्षाही वेगळे चित्र पहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको.