व्हेल माशाची उलटी विक्री करणारी टोळी जेरबंद; तब्बल सव्वा तीन कोटींची उलटी जप्त

व्हेल माशाच्या उलटीची (Whale Fish Vomit) विक्री करणारी सांगली जिल्ह्यातील टोळी सक्रिय झाल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार वनविभागाने सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने न्यू पॅलेस परिसरात ६ जणांच्या टोळीला जेरबंद केले आहे.

    कोल्हापूर : व्हेल माशाच्या उलटीची (Whale Fish Vomit) विक्री करणारी सांगली जिल्ह्यातील टोळी सक्रिय झाल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार वनविभागाने सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने न्यू पॅलेस परिसरात ६ जणांच्या टोळीला जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून सुमारे सव्वा तीन कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी आणि एक कार, दुचाकी मोबाईल संच असा सुमारे ४ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करून विक्री करणारी सांगली जिल्ह्यातील एक टोळी सक्रिय झाल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्याआधारे, वनविभागाच्या करवीर वनविभागाचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचारी यांनी बनावट ग्राहक पाठवून त्या टोळीच्या संपर्कात होते. गुरुवारी दुपारी वनविभागाच्या पथकाने आपल्याला व्हेल माशाची उलटी खरेदी करायची आहे, असं भासवून एका बनावट ग्राहकाला पाठवून न्यू पॅलेस परिसरात त्या ६ जणांच्या टोळीला जेरबंद केले.

    विश्वनाथ नामदास, अलमशहा मुल्ला, उदय जाधव, रफिक सनदी, किस्मत नदाफ, अस्लम मुजावर अशी सहा जणांची नावे असून हे सर्वजण सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ही कारवाई वनविभागाचे सुनील खोत, विजय पाटील, संदीप शिंदे, रुपेश मुल्लानी, संदीप हराळे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्तरित्या करत या सहा जणांकडून सव्वा तीन कोटी रुपये किंमतीची व्हेल माशाची उलटी, एक स्विफ्ट कार, एक दुचाकी, चार मोबाईल संच असा सुमारे पावणेचार कोटींचा मुद्देमाल जप्त केली, अशी माहिती वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांनी दिली.