विविध मागण्यांसाठी कामगार कर्मचारी संघाचा कामगारमंत्र्यांच्या घरावर मोर्चा

आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या नोंदणीकृत बांधकाम कामगार व घरेलू मोलकरीण यांना दिवाळी बोनस म्हणून दहा हजार रुपये आर्थिक मदत व विविध योजनांचा लाभ मिळावा

    कागल : आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या नोंदणीकृत बांधकाम कामगार व घरेलू मोलकरीण यांना दिवाळी बोनस म्हणून दहा हजार रुपये आर्थिक मदत व विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर प्रणित अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या वतीने कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर मोर्चा काढला.

    मंत्री मुश्रीफ उपस्थित नसल्याने साहाय्यक कामगार आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यात एकाही मंत्र्यांला फिरू देणार नाही. असा इशाराही यावेळी देण्यात आला. कोरोना संसर्गाच्या अगोदर महापुराने थैमान घातले होते. याचा मोठा फटका बांधकाम कामगारांना बसला आहे. रोजगारांची व्यवस्था कोलमडून गेली आहे. कर्ज काढून उदरनिर्वाह सुरू आहे.

    कामगार मंत्री या नात्याने कामगारांना आर्थिक मदत जाहिर कराल अशी अपेक्षा होती. परंतु तसे न झाल्यामुळे नाइलाजास्तव जबाब दो मोर्चा काढावा लागला. बांधकाम कामगार निधीतून कामगारांना दिवाळी बोनस द्यावा. नैसर्गिक मृत्यूची ५० ते ६० वर्षाची अट रद्द करून १८ ते ५० करावी, कामगारांसह व त्यांच्या कुटुंबियांना मेडीक्लेम लागू करावा, अटल आवास योजनेतून ६ लाख रुपये मिळावेत, शिक्षित व उच्च शिक्षित मुलांना नोकरीत प्राधान्य द्यावे, आदी मागण्यां करण्यात आल्या.

    बसस्थानकापासून गैबी चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित नसल्याने मोर्चेकऱ्यांनी गैबी चौकातच ठिय्या मारला. मागण्या मान्य न झाल्यास कोणत्याही मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत वाघमारे यांनी दिला.

    मागण्यांचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त संदेश अहिरे यांना देण्यात आले. यावेळी शासकीय अधिकारी रविकिरण आंबी, उमेश चौगुले उपस्थित होते. यावेळी अर्जुन वाघमारे, विजय गायकवाड, समाधान बनसोडे, राणी गायकवाड, फरजाना नदाफ, सदाशिव बाडगीळ, गणेश कुचेकर, भारत कोकाटे, पुष्पा कांबळे, धनश्री पाटील, दिलीप रणदिवे, अनिल माने, लक्ष्मण सावरे आदींसह बांधकाम कामगार व महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. कागलचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता..