लग्नाचा टिळा लावण्यापूर्वीच भरदिवसा तरुणाचा खून; भररस्त्यात तलवारीने सपासप वार

अंलकारसारख्या उच्चभ्रू परिसरात लग्नाचा टिळा लावण्यासाठी निघालेल्या तरूणाचा भररस्त्यात तलवारीने सपासप वार करून निर्घृण खून केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. भरदिवसा या खुनाचा थरार घडला असून, पाहणाऱ्यांच्या देखील अंगाचा थरकाप उडाला होता. हा प्रकार समजताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

    पुणे : अंलकारसारख्या उच्चभ्रू परिसरात लग्नाचा टिळा लावण्यासाठी निघालेल्या तरूणाचा भररस्त्यात तलवारीने सपासप वार करून निर्घृण खून केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. भरदिवसा या खुनाचा थरार घडला असून, पाहणाऱ्यांच्या देखील अंगाचा थरकाप उडाला होता. हा प्रकार समजताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
    अनिल राजेंद्र जाधव (वय २१, रा. डहाणूकर कॉलनी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल याचा विवाह ठरला होता. त्याच्या टिळ्याचा कार्यक्रम आजच रात्री होता. त्याची घाई सुरू होती. त्याची एक बहिण डहाणूकर कॉलनीतील लक्ष्णीनगर येथे राहत होती. तर, एक बहिण कर्वेनगर येथे राहण्यास होती. तो दोन्ही बहिणीकडे ये-जा करत असत व अधून-मधून राहत देखील.

    दरम्यान, एका बहिणीला सोडण्यासाठी तो लक्ष्मीनगर येथे आला होता. बहिणीला सोडून तो दुचाकीने पोतनीस परिसरातून केफिप्टी रस्त्याने जात होता. त्याचवेळी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. तलवारीने त्याच्यावर सपासप वार करण्यात आले. भररस्त्यात त्याच्यावर हा हल्ला झाला. रक्तस्त्राव झाल्याने अनिल याचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर पसार होताच नागरिकांनीही माहिती पोलीसांना दिली. त्यानंतर अलंकार पोलिस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत हल्ल्याचे कारण आणि हल्लेखोरांचा थांगपत्ता लागला नव्हता. अधिक तपास पोलीस करत आहेत.