संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

हे ऑनलाईन प्रशिक्षण अतिशय आवश्यक असल्याने ते सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना ग्लोबल एज्युकेशन अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी सोल्युशन्स यांच्यामार्फत थेट पद्धतीने देण्यात यावे, असा ठराव करण्यात आला आहे.

    पिंपरी:  कोरोनाचा प्रादूर्भाव सुरू झाल्यानंतर सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमांद्वारे शिक्षण दिले जात आहे. मात्र, महापालिका शाळेतील शिक्षक अद्यापही ऑनलाईन प्रशिक्षणाअभावी अडाणी असल्याचे समोर आले आहे. या अडाणी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी आता थेट पद्धतीने ठेकेदारावर १० लाख रूपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे वर्षभर महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईनद्वारे नक्की काय धडे मिळाले की शिक्षण समितीच्या चांगभल्यासाठी हा खटाटोप चालला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    पिंपरी – चिंचवड महापालिकेतील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे यासाठी महापालिका अनेक प्रकारे शैक्षणिक उपक्रम व शिक्षण पूरक साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असते. सध्या कोरोना साथीच्या प्रादूर्भावामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. हे ऑनलाईन शिक्षण आधुनिक तंत्रज्ञान वापरून गुगल क्लासरूम, मायक्रोसॉफ्ट टीम्स, झूम, व्हॉटसअप आदी माध्यमातून देणे शक्य आहे. हे तंत्रज्ञान व माध्यमे वापरण्याचे प्रशिक्षण महापालिका शिक्षकांना देण्यात आलेले नाही.

    हे ऑनलाईन प्रशिक्षण अतिशय आवश्यक असल्याने ते सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना ग्लोबल एज्युकेशन अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी सोल्युशन्स यांच्यामार्फत थेट पद्धतीने देण्यात यावे, असा ठराव करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ५०० शिक्षकांसाठी प्रति शिक्षक कर वगळून दोन हजार रूपये याप्रमाणे १० लाख अधिक कर या मर्यादेत थेट पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कार्यवाहीसाठी ग्लोबल एज्युकेशन अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी सोल्युशन्स यांचा प्रस्ताव आयुक्तांच्या मान्यतेसाठी व त्यानंतर स्थायी समितीच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रशिक्षण देण्याची कार्यवाही लवकरात लवकर सुरू केली जाणार आहे. या प्रस्तावास आज स्थायी समितीने मान्यता दिली.