गुंड गजा मारणेच्या १०० साथिदारांना अटक ; कोथरूड पोलिसांची कारवाई

पोलिसांनी ड्रोन कॅमेर्‍याद्वारे मिरवणुकीचे चित्रीकरण तसेच रस्त्यावरील सर्व सीसीटीव्हीचे फुटेज तपासातून आतापर्यंत १०० आरोपींना निष्पन्न करीत त्यांना अटक केल्याची माहिती कोथरुडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम डांगे यांनी दिली.

    पुणे : तुरुंगातून सुटल्यानंतर गुंड गजानन मारणे व त्याच्या साथीदारांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत जंगी मिरवणुक काढली होती. या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी बेकायदेशीरपणे जमाव केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आतापर्यंत १०० आरोपींना अटक केली. तर २७ अलिशान गाड्या आणि ६४ मोबाईल जप्त केले आहेत.
    गजानन मारणे व त्याच्या साथीदारांनी बेकायदा मिरवणुक काढत जमाव बंदीचा आदेशाचा भंग केला. तसेच हमराज मित्र मंडळाच्या गणपतीची आरती केली होती. याप्रकरणी १६ फेब्रुवारी रोजी दीडशे जणांवर गुन्हा दाखल केला होता. यामध्ये सुरुवातीला गजानन मारणे व त्याच्या ९ साथीदारांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता. मात्र, त्यानंतर पोलिसांनी ड्रोन कॅमेर्‍याद्वारे मिरवणुकीचे चित्रीकरण तसेच रस्त्यावरील सर्व सीसीटीव्हीचे फुटेज तपासातून आतापर्यंत १०० आरोपींना निष्पन्न करीत त्यांना अटक केल्याची माहिती कोथरुडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम डांगे यांनी दिली. गजानन मारणे याच्यावर सध्या जिल्हाधिकार्‍यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करुन त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे.