पुण्यात भरदिवसा घरफोडी करून १८ लाखांचे दागिने लंपास

पुण्यातील बिबवेवाडी परिसरात भरदिवसा घरफोडी करून १८ लाखांचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ही घटना काल बुधवारी २९ जुलै रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या गंभीर प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच, त्यांनी चाचपणी केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दागिने चोरी झालेल्या घरमालकाचे नाव संतोष व्यास असं आहे. संतोष यांचा कॅफेचा व्यवसाय असून ते आपल्या कुटुंबीयांसह पुखराज अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये राहतात. काल त्यांच्या घरातील सर्व लोकं कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप फोडले. त्यानंतर चोरट्यांनी तब्बल १७ लाख ७८ हजारांचे दागिने घरातून चोरून ते पसार झाले. 

दरम्यान, घरमालक संतोष तासाभराने पुन्हा घरी आल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार दिसून आला. त्यानंतर त्यांनी बिबवेवाडी पोलिसांना या घटनेची संपूर्ण माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हे दागिने कशाप्रकारे चोरीला गेले आणि चोरट्यांनी घरात प्रवेश कसा केला. या सर्व गोष्टींची पुढील चौकशी पोलीस करत आहेत.