२ कोटींची विकासकामे पंचायत समितीने अडवली

शिक्रापूरच्या सरपंच, उपसरपंचांचा उपोषणाचा इशारा
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) ग्रामपंचायत निधीतील कामांच्या ई निवीदा प्रशासकीय त्रुटी सांगून पंचायत समितीने दोन कोटींच्या विकासकामांना स्थगित दिली असून आत्तापर्यंत दोन वेळा विकास कामांच्या निविदा रद्द करण्यात आल्या आहे. फक्त राजकीय विरोधातून सदर अडवणूक होत असून कामे अडवण्याचा प्रकार शिरूर पंचायत समितीतुन होत असल्याचा आरोप माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांनी केला असून या विरोधात उपोषण करण्याचा इशारा सरपंच हेमलता राऊत व उपसरपंच जयश्री दोरगे यांनी दिला आहे.

-२ कोटी १० लाखांच्या विकासकामांची मंजुरी
शिक्रापूर (ता. शिरूर) ग्रामपंचायतच्या वतीने दोन महिन्यांपासून पाठपूरावा करीत असलेल्या शिक्रापूर ग्रामपंचायतीने ही बाब गटविकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देताच शिक्रापूर ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना जाणुनबुजून सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा उद्योग शिरुर पंचायत समिती स्तरावर झाल्याचे सरपंच हेमलता राऊत यांनी सांगितले. शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या या आर्थिक वर्षातील एकुण २ कोटी १० लाखांच्या विकासकामांची मंजुरी प्रक्रिया पूर्ण होवून तिचे मुल्यांकन देखील पंचायत समिती स्तरावर पूर्ण झाले. याबाबत ग्रामपंचायतीने तसा पाठपूरावा करुन सदर कामांचे ई टेंडरींगही पूर्ण केले.

-चौकशी पूर्ण होईपर्यंत ई निवीदा करु नये
याबाबत काही त्रांत्रिक त्रुटींबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अर्ज देताच निवीदा ज्या प्रशासन अधिकाऱ्यांनी राबविली त्यांनाच विचारुन सदर प्रक्रिया पुन्हा राबवून हे काम तात्काळ सुरू करण्याची प्रक्रिया पंचायत समिती स्तरावर होण्याऐवजी या कामी सहाय्यक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे यांचेकडे १७ जुलै रोजी चौकशी सोपवून पंचायत समिती मोकळी झाली. दरम्यान याबाबत पुन्हा प्रभारी गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत ई निवीदा करु नये असे पत्रच ६ ऑगस्ट रोजी काढले आहे. याचा उद्देश म्हणजे शिक्रापूर ग्रामपंचायतीला कुठलीच प्रशासकीय प्रक्रीया राबविता येवू नये म्हणून कोरोना मुळे  शिक्रापूरातील ग्रामविकास अधिकारी यांना तात्पूरते म्हणून निमगाव म्हाळूंगीला वर्ग केले आणि शिक्रापूर साठी सणसवाडीचे ग्रामविकास अधिकारी बाळनाथ पवने यांना नियुक्त केले. या सर्व घडामोडींमध्ये गावच्या तब्बल दोन कोटींच्या विविध विकास कामांच्या उद्घाटनांना स्थगित करुन शिरुर पंचायत समितीने एकुणच पंचायत राज व्यवस्थेलाच उध्द्स्थ करण्याचा डाव आखल्याने आमच्या गावातील आमची कामे तात्काळ सुरू करुन न दिल्यास आम्ही सामुहिकरित्या बेमुदत उपोषणास बसत असल्याचा इशारा सरपंच हेमलता राऊत व उपसरपंच जयश्री दोरगे यांनी दिला आहे.