राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये २ हजार ३५२ खटले निकाली; ५ कोटी ७४ लाखांचा महसूल जमा

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत २,३५२ प्रलंबित खटले निकाली काढून सुमारे ५ कोटी ७४ लाख ७९,२५९ रूपये महसूल रक्कम वसूल करण्यात आली.

    बारामती तालुका विधी सेवा समिती, जिल्हा न्यायालय बारामती व वकील बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोक अदालतचे उद्धघाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्ष जे. पी. दरेकर व जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. जे बांगडे, जे. ए. शेख तसेच न्यायाधीश कांबळे, न्या. ए. जे. गि-हे, बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. चंद्रकांत सोकटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करुन करण्यात आले. यामध्ये प्रलंबित खटले तडजोडीने निकाली काढण्यात आले. महसूल सुमारे ५ कोटी ७४ लाख ७९ हजार २५९ रुपयांची रक्कम वसूल झाली.

    शनिवारी (दि. २६) सकाळी १० वाजता कामकाजाला सुरुवात झाली. वैवाहिक वाद, दिवाणी खटल्यांसह मोटार अपघात, एनआय ऍक्ट, औद्योगिक वाद, घरपट्टी, पाणीपट्टी आदी प्रकरणांवर न्यायनिवाडा झाला. प्रलंबित खटले २१८, दाखल पूर्व प्रकरणे २१३४ असे एकूण २३५२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या निवाड्यासाठी एकूण १०,७७४ प्रकरणे ठेवण्यात आली होती.

    जिल्हा न्यायाधीश-१ व अति.सत्र न्यायाधीश जे. पी. दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज झाले. लोकअदालत यशस्वी होण्यासाठी बारामती बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. चंद्रकांत सोकटे व कार्यकरणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍङ. चंद्रकांत सोकटे, अध्यक्षीय मनोगत जे. पी. दरेकर यांनी केले. सूत्रसंचालन ऍड. धीरज लालबिगे यांनी केले. आभार संघटनेचे सचिव ऍङ. अजित बनसोडे यांनी मांडले. या कार्यक्रमास बहुसंख्य वकील, पक्षकार उपस्थित होते.