कोरोनामुळे २२ टक्के पुणेकरांनी गमावल्या नोकऱ्या, उत्पन्नही घटले; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती आली समोर

सर्वेक्षणानुसार कोरोनामुळे २२ टक्के लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येऊन त्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तसेच अनेक उद्योगांचे दिवाळे निघाले असून उत्पन्नही घटले आहे. गतवर्षी कोरोनामुळे सुरुवातीच्या काळात देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला

  पुणे: कोरोनाच्या विषाणूने जगभर थैमान घातल्याने जगाची मोठी हानी झाली. जनजीवन विसकळीत होण्याबरोबरच , मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान ही झालेले दिसून येते. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून पुण्यातील लोकांना त्याचा किती फटका बसला याचे सर्वेक्षण केले आहे.   या सर्वेक्षणानुसार कोरोनामुळे २२ टक्के लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येऊन त्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तसेच अनेक उद्योगांचे दिवाळे निघाले असून उत्पन्नही घटले आहे. गतवर्षी कोरोनामुळे सुरुवातीच्या काळात देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला. याकाळात पुण्यातील जवळपास २२ टक्के नागरिकांना नोकरी गमवावी लागल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे  तसेच ५१ टक्क्याहून हून अधिक नागरिकांच्या उत्पन्नात घट झाल्याचेही समोर आले आहे.

  कोरोना काळात आरोग्याच्या इतर तक्रारी कमी झाल्या असल्यातरी मानसिक आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. निम्म्याहून अधिक नागरिकांना कोरोनाबाबत भीती वाटत असल्याचं या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

  ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशन आणि अमेरिकेतील कार्नेगी मेलन विद्यापीठाच्या माध्यमातून तरुणांच्या या गटाने हे सर्वेक्षण केले आहे. यामधे कोरोनाचा पुणेकरांवर झालेल्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला . या सर्वेक्षणाला २,२४५ लोकांनी प्रतिसाद दिला. त्यामध्ये १८ ते ४५ वर्षे वयोगटातील ६९ टक्के नागरिक सहभागी झाले होते. साधारण नोव्हेंबर- डिसेंबर २०२० च्या कालावधीत सर्वे करण्यात आला. यात १५ स्वयं सेवी संस्थांचा सहभाग होता.

  सर्वेक्षणात पुणेकरांमधील कोरोनाच्या परिस्थिती बद्दलची जागरूकता, सवयी आणि त्यांच्यावर कोरोनात झालेले आरोग्य विषयक आणि आर्थिक परिणाम अभ्यासण्यात आले. सामुदायिक शहाणपण या मानसशास्त्रातील तंत्राचा वापर करून परिस्थिती बद्दलचे अंदाजही या अंतर्गत वर्तविण्यात आले आहेत, असं श्रेया धावरे आणि काजल मोहिते या सर्व्हेक्षण करणाऱ्या विद्यार्थिनींनी सांगितलं आहे.

  नोकरी गमावलेले : २२टक्के, नोकरी न गमावलेले : ७८ टक्के, कोरोना काळात उत्पन्नात झालेले बदल (टक्केवारीत), उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट : २३ टक्के
  उत्पन्नात छोट्या प्रमाणात घट :२८ टक्के, उत्पन्नात घट नाही : ४२ टक्के, उत्पन्नात छोट्या प्रमाणात वाढ :५ टक्के, उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ : २ टक्के

  सहभागींनी सरकारकडून देण्यात येणाऱ्या करोनाविषयक माहितीवर तर ८७ टक्के सहभागींनी सामाजिक संस्थांकडून देण्यात येणाऱ्या करोनाविषयक माहितीवर वि‌श्वास दर्शविला. दूरचित्रवाणीतून मिळणाऱ्या माहितीवर ५०टक्के विश्वास, सोशल मीडियावर मिळणाऱ्या माहितीवर २०टक्के विश्वास असल्याचं या सर्व्हेत पुणेकरांनी सांगितलं आहे. कोरोना काळातलं हे सर्व्हेक्षण धक्कादायक असलं तरी विचारमंथन करायला लावणारं आहे. कोरोनाचा जवळपास प्रत्येक घटकांवर परिणाम झाला असला तरी २२ टक्के नोकरी आणि उत्पन्नात घट झाली हे गंभीर आहे.