पुणेकरांनो सावधान ! कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढतोय; शहरात कोरोनाचे नवीन २९८ रुग्ण

गेल्या पंधरा दिवसापासून शहरातील कोरोनाबाधित नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या आठवड्यात प्रति दिवसाला सरासरी शंभरच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. बुधवारी ही संख्या दोनशेच्या पुढे गेली होती. गुरुवारी हीच संख्या तीनशेच्या जवळ पोचली आहे.

    पुणे : सावधान ! कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत शहरात कोरोनाचे नवीन २९८ रुग्ण आढळून आले आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित नवीन रुग्णांची संख्या सातत्याने वाढू लागल्याने तिसरी लाट सुरु झाल्याची भिती निर्माण झाली आहे. तर नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांना घराबाहेर न पडता, घरीच राहून साध्या पध्दतीने नववर्षाचे स्वागत करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

    गेल्या पंधरा दिवसापासून शहरातील कोरोनाबाधित नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या आठवड्यात प्रति दिवसाला सरासरी शंभरच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. बुधवारी ही संख्या दोनशेच्या पुढे गेली होती. गुरुवारी हीच संख्या तीनशेच्या जवळ पोचली आहे. जुन, जुलै महीन्यानंतर कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागली होती. त्यानंतर प्रथमच शहरात एकाच दिवशी एवढ्या जास्त संख्येने नवीन रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. ऑगस्ट, सप्टेंबर या महीन्यात सरासरी दोनशे रुग्ण नवीन आढळून येत होते. त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महीन्याच्या पहील्या पंधरवड्यापर्यंत हा आकडा शंभरच्या खाली आला होता. परंतु आता पुन्हा रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. नागरीकांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

    नववर्षाचे स्वागत घरातूनच करा : आवाहन

    राज्य सरकारने ओमायक्रॉन आणि कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने नुकतेच नवीन आदेश जारी केले आहेत. त्यानुसार पुणे महापालिका प्रशासनाने आदेश जारी केले असुन, शहरातही फटाक्यांची आतिषबाजी, कोणत्याही धार्मिक सांस्कृतिक / कार्यक्रमाचे आयोजन करण्यास बंदी घातली आहे़ रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर बंदी घातली आहे़ नव वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसन क्षमतेच्या ५० टक्के तर खुल्या जागेतील कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५ टक्के मर्यादा घालून देण्यात आली आहे़ तसेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही, मास्कचा वापर अनिवार्य राहिल आदी सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत़ कोरोनाच्या विशेषत: ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सदर नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे़