पुण्याच्या पोलीस आयुक्तांची ओळख आता 'मोक्का मॅन' अशी झाली आहे. पोलीस आयुक्तांनी आज एका कुविख्यात गँगला ५० वा मोक्काचा दणका देत अर्ध शतकी खेळी केली.

    पुणे : पुण्याच्या पोलीस आयुक्तांची ओळख आता ‘मोक्का मॅन’ अशी झाली आहे. पोलीस आयुक्तांनी आज एका कुविख्यात गँगला ५० वा मोक्काचा दणका देत अर्ध शतकी खेळी केली. आयुक्तांच्या या कारवाईने मात्र, गुन्हेगार चडीचूप झाले आहेत. कुख्यात गुंड बल्लूसिंग टाकच्या गँगवर हा मोक्का लावण्यात आला आहे.

    बल्लूसिंग प्रभूसिंग टाक (रा. वानवडी), उजालासिंग प्रभूसिंग टाक (रा. वानवडी), सोमनाथ नामदेव घारोळे (रा. हडपसर), पिल्लूसिंग कालूसिंग जुन्नी (रा. गोसावीवस्ती, हडपसर), जलसिंग रजपुतसिंग दुधानी (रा. रामटेकडी), गोरखसिंग गागसिंग टाक (रा. हडपसर) अशी मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेल्याची नावे आहेत. यातील टाक बंधूना पोलीसांनी अटक केलेली आहे.

    बल्लूसिंग टाक हा पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर २०१८ पासून गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरोड्याची तयारी, जबरी चोरी, खूनाचा प्रयत्न, घातक शस्त्र यासह गंभीर गुन्हे केले आहेत. त्याने वेगवेगळ्या साथीदारांना घेऊन गुन्हे केले आहेत. टोळीचे वर्चस्व रहावे तसेच आर्थिक फायद्यासाठी गुन्हे करत असल्याचे दिसून आले आहे. त्याच्यावर यापूर्वी देखील कारवाई करण्यात आलेली आहे. परंतु, त्याचे गुन्हे सुरूच होते. दरम्यान, कोथरूड परिसरात टवेरा कारमधून येत घातक शस्त्राने दरोडा टाकण्याच्या तयारीत येऊन एका सोसाटीतील बंद फ्लॅट फोडून दरोडा टाकून पळून जात असताना पोलीसांनी त्यांना पाहिले होते. त्यांचा पाठलाग केल्यानंतर त्यांनी शासकीय कर्तव्य करताना अडथळा निर्माण करून खूनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    या गुन्ह्याचा तपास करत असताना बल्लूसिंग याच्या टोळीचा हैदोस सुरूच असल्याचे समोर आले. त्यानंतर कोथरूड पोलीस ठाण्याचे निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी या टोळीवर मोक्का लावण्याचा प्रस्तव पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी या प्रस्तावाची छाननीकरून तो अप्पर पोलीस आयुक्तांकडे पाठविला. त्यानुसार, हा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे मान्यतेसाठी आली. पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारी टोळ्यांना लगाम लावण्यासाठी कठोर पावले उचलेली आहेत. त्यांनी कारवाईच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्तांनी तात्काळ या टोळीवर मोक्काची कारवाईचा आदेश दिला आहे.

    पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी ११ महिन्यात तब्बल ५० टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे. आजची त्यांची अर्ध शतकी ५० वी मोक्का कारवाई ठरली आहे. त्यामुळे पुणेकर त्यांना आता मोक्का मॅन असे म्हणू लागले आहेत. पण, आयुक्तांच्या या दणकेबाज कारवाईने गुन्हेगारांमध्ये दहशत पसरली आहे. पोलीस आयुक्तांच्या मोक्का कारवाईने गुन्हेगारी टोळ्यांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. यापुढेही गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का कारवाई करत त्यांना लगाम लावण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.