
सचिन सातव यांच्यासह ८ विद्यमान संचालकांना पुन्हा उमेदवारी
बारामती: बारामती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार प्रगती पॅनलचे १५ उमेदवारांची यादी जाहीर केली असून यामध्ये १५ पैकी ७ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून विद्यमान संचालक सचिन सातव यांच्यासह ८ विद्यमान संचालकांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
बारामती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि ६) राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार प्रगती पॅनल मध्ये उमेदवारी मागणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती बारामती शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये घेतल्या होत्या. यावेळी झालेल्या जाहीर मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती बँकेच्या निवडणुकीसाठी जुन्या व नव्या यांचा मेळ घालून उमेदवारी दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सहकार प्रगती पॅनलच्या उमेदवारांची यादी जाहीर करून या पंधरा उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये विद्यमान संचालकांपैकी सचिन सातव, नुपूर आदेश वडूजकर, श्री दत्तात्रय कुलकर्णी, कल्पना प्रदीप शिंदे, वंदना उमेश पोतेकर, उद्धव सोपानराव गावडे, विजय प्रभाकर गालिंदे या ८ संचालकांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर विद्यमान अध्यक्ष श्रीकांत सिकची यांचे चिरंजीव मंदार सिकची, रणजीत वसंतराव धुमाळ, जयंत विनायकराव किकले, डॉ सौरभ राजेंद्र मुथा, किशोर शंकर मेहता, नामदेव निवृत्ती तुपे, रोहित वसंतराव घनवट या ७ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.