‘जनता वसाहतचा भाई मीच’; खून झालेल्या कुविख्यात गुन्हेगाराच्या अल्पवयीन मुलाचा राडा

जनता वसाहत परिसरातील खून झालेल्या कुविख्यात गुन्हेगाराच्या अल्पवयीन मुलाने चांगलाच राडा घातला आहे. एका कुटुंबाला दारात जाऊन त्यांना 'तुमच्या मुलाला मारून टाकणार' असल्याची धमकी देत गाडीची तोडफोड सुरू केल्याने त्यांनी दरवाजा उघडताच त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर जमलेल्या नागरिकांना देखील शिवीगाळ करून 'मीच इथला भाई आहे', असे म्हणत तुंबळ गोंधळ घातला. 

    पुणे : जनता वसाहत परिसरातील खून झालेल्या कुविख्यात गुन्हेगाराच्या अल्पवयीन मुलाने चांगलाच राडा घातला आहे. एका कुटुंबाला दारात जाऊन त्यांना ‘तुमच्या मुलाला मारून टाकणार’ असल्याची धमकी देत गाडीची तोडफोड सुरू केल्याने त्यांनी दरवाजा उघडताच त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर जमलेल्या नागरिकांना देखील शिवीगाळ करून ‘मीच इथला भाई आहे’, असे म्हणत तुंबळ गोंधळ घातला.

    याप्रकरणी ४२ वर्षीय व्यक्तीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दोन अल्पवयीन मुलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

    तीन वर्षांपुर्वी जनता वसाहतमधील वर्चस्व वादातून एका कुविख्यात गुन्हेगाराचा गोळ्या झाडून व कोयत्याने निर्घृण खून केला होता. तडीपार कालावधीत देखील वसाहतीत येऊन हा खून करण्यात आला होता. या दोन गटात तीव्र वाद असून, एकमेकांना जीवे मारण्याचा विडाच त्यावेळी उचलला गेल्याचे बोलले जात होते. त्यातूनच हा खून झाला होता. इतकच नाही तर त्या फरार दुसऱ्या गटाच्या कुविख्यात गुन्हेगारांने फरार काळात पोलीसांच्या नाकेनऊ आणला होता. या खूनानंतर जनता वसाहत काही काळ शांत होती.

    दरम्यान, खून झालेल्या या कुविख्यात गुन्हेगाराचा अल्पवयीन मुलगा सध्या जनता वसाहतचा ‘मीच भाई म्हणून मिरवत आहे’.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जनता वसाहतीमधील आझाद तरुण मंडळाच्या खालच्या टप्यात राहतात. दरम्यान, त्यांच्या मुलाची व आरोपींची खुन्नस आहे. यावरूनच या अल्पवयीन मुलाने इतर साथीदार यांच्या मदतीने त्यांच्या दारात जाऊन ‘तुमच्या मुलाचा खून करणार आहे. त्याला भाई बनायचे आहे काय, मीच जनता वसाहतचा भाई आहे’, असे म्हणत चांगलाच गोंधळ घातला. त्यात हातात कोयते. त्यामुळे तक्रारदार घरातून बाहेरच आले नाही. त्यावेळी या टोळक्याने त्यांच्या गाडीची तोडफोड केली. त्यावेळी तक्रारदारांनी दरवाजा उघडला असता या टोळक्याने त्यांच्यावर वार केले. परंतु, ते वार चुकविल्याने ते थोडक्यात बचावले.

    त्यानंतर जमलेल्या नागरिकांमध्येही या टोळक्याने दहशत माजवत मोठ-मोठ्याने तुफान गोंधळ घातला अन तेथून पसार झाले. या घटनेनंतर पोलीसांनी येथे धाव घेतली. अधिक तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.