पुण्यातील ढोल-ताशा पथकाच्या ६० जणांच्या ग्रुपला हैद्राबादेत डांबले; १५ मुलींचाही समावेश

प्रेमचंद यादव व इतरांनी या मुलांना आम्ही जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. तसेच, त्यांना अडविण्यात आले. त्यामुळे पथकातील मुली व मुलं घाबरून गेले. शेवटी या मुलांनी शुक्रवारी रात्री संबंधितांशी वाद झाले. तरीही त्यांना परत येण्यास अडथळे आणले.

  पुणे : हैद्राबादमधील सिंकदराबाद येथे वादनासाठी गेलेल्या ढोल-ताशा (Dhol Tasha) पथकातील तब्बल ६० तरूण-तरूणींना डांबून ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. हे प्रकरण समोर आल्यानंतर पुण्यातील मनसेच्या माजी नगरसेविका रूपाली ठोंबरे (Rupali Thombare) व सामाजिक कार्यकर्ते अजितसिंह परदेशी यांनी हैद्राबादमधील नगरसेविकांशी संपर्क साधत त्यांच्या व पोलीसांच्या मदतीने मुलांची सुखरूप सुटका केली आहे. रात्री हा ग्रुप पुण्याकडे रवाना झाला. मात्र, या घटनेने पुण्यात मोठी खळबळ उडाली.

  पुण्यातील ‘स्वामी ओम प्रतिष्ठाण ढोल-ताशा पथक’ गेल्या आठवड्यात (दि. १६) हैद्राबाद येथील सिंकदराबाद येथे वादन करण्यासाठी गेले होते. प्रेमचंद यादव यांच्याकडून ही सुपारी पथकाला मिळाली होती. अडीच लाख रुपये चार दिवसांचे ठरले होते. त्यानुसार हे पथक गेले होते. या पथकात १५ मुली व इतर मुले होती.

  दरम्यान, चार दिवस पथकाने वेगवेगळ्या गावात वादन केले. चार दिवस झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे पैसे मागितले. परंतु, त्यांनी विनंती करून आणखी दोन दिवस वादन करण्यास सांगितले. त्यानुसार, पथकाने २२ सप्टेंबरपर्यंत वादन केले. परंतु, २३ सप्टेंबर रोजी हा ग्रुपर परत निघाला असता त्यांना पैसे न देताच त्यांच्या वाहनांचे कागदपत्रे काढून घेतली. तसेच, आणखी दोन दिवस वादन करायचे असे म्हणत वाद घालण्यास सुरूवात केली. मात्र, पथकाने त्यांना वादन करण्यास नकार दिला.

  यावेळी प्रेमचंद यादव व इतरांनी या मुलांना आम्ही जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. तसेच, त्यांना अडविण्यात आले. त्यामुळे पथकातील मुली व मुलं घाबरून गेले. शेवटी या मुलांनी शुक्रवारी रात्री संबंधितांशी वाद झाले. तरीही त्यांना परत येण्यास अडथळे आणले. त्यांची कागदपत्रे परत दिली जात नव्हती. मग, या पथकाने शनिवारी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते अजितसिंह परदेशी व मनसेच्या माजी नगरसेविका रूपाली ठोंबरे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यावेळी ठोंबरे व परदेशी यांनी तात्काळ हालचाली करत सिंकदराबाद येथील स्थानिक नगरसेविका बसेरिया पुजारी यांच्याशी संपर्क साधला. तसेच, पोलीस यंत्रणेला देखील कळविले.

  त्यानंतर सिंकदराबाद पोलीस व नगरसेविका पुजारी यांनी येथे धाव घेतली. या मुलांशी संवाध साधत त्यांना धीर दिला व त्यांच्या तेथून सुटका केली. त्यांना पोलीस ठाण्यात आणत त्यांची व्यवस्था केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीला बोलवून त्याच्याकडून तडजोडी करत पैसे घेऊन दिले. त्यानंतर या मुलांना रात्री सुखरूप पुण्याकडे रवाना केले आहे. परंतु, या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.

  दोन लाख कमी मिळाले…

  महाराष्ट्रातील पथके बाहेर जाऊन वादन करत आहेत. ही अमिभामानाची गोष्ट आहे. ढोल-ताशा पथके कला देशभर पसरवत आहेत. परंतु, आज हा अत्यंत वाईट अनुभव आला आहे. दोन लाख रुपये कमी देण्यात आले. तर, प्रचंड मनस्ताप झाला. परंतु, पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक पोलीस यांनी खूप मदत केली आहे.

  – शुंभकर वायचळ, स्वामी ओम प्रतिष्ठाण ढोल-ताशा पथक, संस्थापक-अध्यक्ष