
दोन मुलांचा आजारपणामुळे मृत्यू झाल्यानंतर नैराश्येतून वडिलांनी गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
पुणे : दोन मुलांचा आजारपणामुळे मृत्यू झाल्यानंतर नैराश्येतून वडिलांनी गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. राहत्या घरात त्यांनी पंख्याला गळफास घेतला. सिंहगड रोड येथील नांदेड फाटा परिसरात ही घटना घडली आहे.
संजीव दिगंबर कदम (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीव कदम हे पत्नीसह नांदेड फाटा परिसरात राहत होते. नांदेड जिल्ह्यातील होते. पुण्यात नोकरीनिमित्त राहत होते. वर्षभरापूर्वी संजीव यांचा चौदा वर्षांचा मुलगा व दहा वर्षांची मुलगी या दोघांचेही काही दिवसांच्या अंतराने आजारपणामुळे निधन झाले होते. त्यानंतर संजीव हे नैराश्येत होते. नुकतेच त्यांनी पत्नीला माहेरी सोडले होते.
सोमवारी दुपारपासून त्यांची पत्नी त्यांना फोन लावत होती. मात्र, ते फोन उचलत नव्हते. त्यामुळे त्यांनी ओळखीच्या व्यक्तींना फोन करुन घरी जाऊन पाहावयास सांगितले. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी त्यांना संजीव कदम यांनी पंख्याला गळफास घेतलेल्या दिसून आले. अधिक तपास हवेली पोलीस करत आहेत.