धक्कादायक ! मुलगा होत नसल्याने सुरु होता छळ; कंटाळून अखेर विवाहितेने मुलीसह संपवले जीवन

नोव्हेंबर 2020 पासून मुलगा होत नाही, या कारणावरून सतत मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. तिला सातत्याने मारहाण करण्यात येत होती. तिला सोडचिट्टी देण्याची भाषा सतत केली जात होती.

    भिगवण : मुलगा होत नाही, तुला सर्व मुलीच आहेत. या कारणास्तव एका विवाहितेचा मागील अनेक दिवसांपासून मानसिक व शारिरीक छळ (Harassment) करण्यात आला. या त्रासास कंटाळून या विवाहितेने मंगळवारी (दि. २१) रोजी सकाळी विहिरीत आपल्या मुलीसह उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केली.

    मनिषा महादेव दराडे (वय २७), भाग्यश्री महादेव दराडे (वय ३) अशी मृतांची नावे आहेत. या दोघीही इंदापूर तालुक्यातील अकोले गावच्या रहिवासी आहेत. या घटनेबाबत मयत मनीषा दराडे हिचे वडील नवनाथ विठोबा खैरे (वय ६५, रा. दादेगाव ता.आष्टी जि.बीड) यांनी भिगवण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनिषाचा पती महादेव चंद्रकांत दराडे व रुपाली शरद खैरे (दोघे रा. अकोले, ता. इंदापूर) यांच्याविरुद्ध् दाखल करण्यात आला आहे.

    नोव्हेंबर 2020 पासून मुलगा होत नाही, या कारणावरून सतत मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. तिला सातत्याने मारहाण करण्यात येत होती. तिला सोडचिट्टी देण्याची भाषा सतत केली जात होती. या त्रासाला कंटाळून तिने इंदापूर तालुक्यातील अकोले येथील अशोक यशवंत गायकवाड यांच्या विहिरीतील पाण्यात उडी मारुन आत्महत्या केली, अशी फिर्याद मयत मनीषाचे वडील यांनी दिली आहे.

    दरम्यान, या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस-पाटील हे करीत आहेत.