अंत्यविधीसाठी CNG वरील ‘पुष्पक शववाहिनी’ उपलब्ध होणार

महापालिकेच्या सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात पीएमपीएमएल निधी या लेखाशिर्षावर २३८ कोटी २१ लाखाची तरतुद करण्यात आली आहे. यामध्ये संचलन तुट १६५ कोटी ७१ लाख रूपये, विविध प्रकारचे पास २ कोटी ५० लाख, बस खरेदी ७० कोटी असा खर्च गृहित धरण्यात आला आहे.

  पिंपरी: पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी अंत्यविधीकरिता(funeral) पीएमपीएमएलकडून २४ तास पुष्पक शववाहिनी(Pushpak Shavavahini) सेवा पुरवली जाते. पीएमपीएमएलच्या संचलन ताफ्यातून बाद झालेल्या बसचे रूपांतर शववाहिनीमध्ये केले जाते. मात्र, केंद्र सरकारने १५ वर्षे आयुर्मान पूर्ण झालेल्या डिझेल सरकारी वाहने ताफ्यातून बाद करण्याचे धोरण आखल्याने आता सीएनजीवरील( CNG )शववाहिनी खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी पुणे महापालिकेकडून सहा आणि पिंपरी – चिंचवड महापालिकेकडून चार सीएनजी इंधनावरील शववाहिन्यां खरेदी केल्या जाणार आहेत.

  पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत (पीएमपीएमएल) पुणे आणि पिंपरी – चिंचवड महापालिका हद्द आणि उपनगरामध्ये प्रवासी वाहतुकीसाठी बस संचलन करण्यात येते. तथापि, पूर्व पीएमटी असताना वाहन व्यवहार समितीच्या आग्रहानुसार परिवहन सेवेद्वारे महापालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी अंत्यविधीकरिता २४ तास शववाहिनी पुरवली जाते. ही सेवा गेली २५ वर्षे राबविण्यात येत आहे. पीएमपीएमएलचे मुख्य कामकाज दैनंदीन प्रवासी वाहतुक करणे हे आहे. तथापि, दोन्ही महापालिकांच्या विनंतीनुसार, हे कामकाज करण्यासाठी संचलन ताफ्यातून बाद करण्यात आलेल्या बसचे रूपांतर पुष्पक किंवा शववाहिनीमध्ये करण्यात आले आहे. यामध्ये पीएमपीएमएलचे १६ चालक २४ तासाकरिता पुणे विभागाकरिता चार शववाहिन्यांवर आणि पिंपरी – चिंचवड विभागाकरिता दोन शववाहिन्यावर कामकाजासाठी ठेवावे लागतात.

  केंद्र सरकारने १५ वर्षे आयुर्मान पूर्ण झालेल्या डिझेल सरकारी वाहनांचे रजिस्ट्रेशन नुतनीकरण न करता नोंदणी रद्द करणे व ही वाहने ताफ्यातून बाद करण्यास मंजुरी देण्याचे धोरण निश्चित केले आहे. पीएमपीएमएलच्या १५ वर्षे आयुर्मान पूर्ण झालेल्या डिझेल वाहनांची ऑनलाईन नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे होत नाही. तसेच पावतीही प्राप्त होत नाही. परिणामी पीएमपीएमएलकडे संचलनात असलेल्या जुन्या पुष्पक शववाहिन्यांचे नुतनीकरण होत नसल्याने ही वाहने बाद करणे गरजेचे आहे. त्यासाठी पुणे आणि पिंपरी – चिंचवड महापालिका हद्द आणि उपनगरामध्ये शववाहिनी सेवा पुरविण्यासाठी पुणे महापालिकेकडून सहा आणि पिंपरी – चिंचवड महापालिकेकडून चार सीएनजी इंधनावरील पुष्पक शववाहिनी खरेदी कराव्यात. या शववाहिनी पीएमपीएमएलला हस्तांतरीत केल्यास शववाहिनीची सेवा देणे शक्य होणार आहे.

  संचलन तुटीपोटी पीएमपीएमएलला एका महिन्याचे बारा कोटी देणार

  पिंपरी – चिंचवड महापालिकेतर्फे पीएमपीएमएलला संचलन तुटीपोटी सप्टेंबर २०२१ या एका महिन्यांकरिता १२ कोटी रूपये आगाऊ स्वरूपात देण्यात येणार आहेत. पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडील ३० ऑगस्ट २०२१ रोजीच्या पत्रान्वये सन २०२०-२१ ची अंदाजित संचलन तुट ५१४ कोटी २८ लाख रूपये गृहित धरण्यात आली आहे. त्यापैकी ४० टक्क्यानुसार पिपरी – चिंचवड महापालिकेचा संचलन तुटीचा हिस्सा २०५ कोटी ७१ लाख रूपये आहे. सप्टेंबर २०२१ करिता १७ कोटी १४ लाख रूपये संचलन तुटीचे द्यावेत, अशी विनंती केली आहे. महापालिकेच्या सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात पीएमपीएमएल निधी या लेखाशिर्षावर २३८ कोटी २१ लाखाची तरतुद करण्यात आली आहे. यामध्ये संचलन तुट १६५ कोटी ७१ लाख रूपये, विविध प्रकारचे पास २ कोटी ५० लाख, बस खरेदी ७० कोटी असा खर्च गृहित धरण्यात आला आहे. या रकमेतून १२ कोटी रूपये सन २०२०-२१ च्या अंदाजित संचलन तुटीचे लेखापरिक्षण होऊन तुट कायम होईपर्यंत सप्टेंबर २०२१ मध्ये द्यायचे आहेत.