व्यापाऱ्याची दिशाभूल करून सव्वा लाख लुटले

मागील काही दिवसांपूर्वी शहारातील पोलिस नाईक यांच्या घरी तसेच इतर ठिकाणी दरोडा पडली असल्याची घटना घडली होती. त्या दरोड्यातील आरोपी ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळून आले होते. मात्र, या प्रकरणाचा तपास अजून उघड झाला नाही.

    दौंड / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : दौंड शहरातील व्यापाऱ्याला दिशाभूल व हातचलाखी करत 1 लाख 16 हजार 730 रूपये रोकड लुटले असल्याची घटना घडली आहे.

    दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील विलास स्टोअर्स या कपड्याच्या दुकानात 30 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी दोन नागरिक आले होते. सुरुवातीला त्यांना चार ते पाच सॉक्सचे जोड दाखवले. यातील एक जोड त्यांनी घेतला. त्यानंतर दुकानातील मॅनेजरला 50 रुपये दिले. मॅनेजरने ते पैसे गल्ल्यात ठेवले. यातील 20 रुपये परत दिले. त्यातील एका नागरिकाने त्याच्या पाठीमागील खिशातून पाकीट काढत भारतीय चलनातील सध्या बंद असलेली 500 रुपयांची नोट काढून दाखवली.

    तसेच त्याच्याजवळील 2 हजार रुपयांची नोट काढत भारतीय चलनातील नोट कशी हे पाहता पाहता तो काउंटरच्या आत येऊन पाहणी केली. त्यानंतर काही नोटांची अदलाबदल करत ते तेथून निघून गेले. त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे निर्दशनास आल्यावर विलास क्लॉथ सेंटर मॅनेजर पांडुरंग धोंडीबा गुंड यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर नागरिक हे दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून, या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार संतोष शिंदे हे तपास करीत आहेत.

    दौंड पोलिसांना वाढत्या चोऱ्यांचे आव्हान

    मागील काही दिवसांपूर्वी शहारातील पोलिस नाईक यांच्या घरी तसेच इतर ठिकाणी दरोडा पडली असल्याची घटना घडली होती. त्या दरोड्यातील आरोपी ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळून आले होते. मात्र, या प्रकरणाचा तपास अजून उघड झाला नाही. काल घडलेल्या घटनेत ही चोरटे कॅमेरात दिसत आहेत. त्यामुळे जर पोलिसांच्या घरी पडलेल्या दरोड्याचा तपास पोलीस लावू शकत नाहीत तर या चोरीचा तपास कशाप्रकारे लावतील, याची चर्चा दौंड शहरात सुरू आहे.