सुरक्षा रक्षकाला बेशुद्ध करून कंपनीत टाकला ६६.५० लाखाचा दरोडा; सातजण अटकेत

या कंपनीच्या सुरक्षा रक्षकाच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळून देऊन आठ जणांनी मिळून कंपनीत दरोडा टाकला. त्यात ६६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे.

पिंपरी: खेड तालुक्यातील वासुली येथे द एस एफ ओ टेक्नॉलॉजीएस प्रायव्हेट लिमिटेड ,या कंपनीच्या सुरक्षा रक्षकाच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळून देऊन आठ जणांनी मिळून कंपनीत दरोडा टाकला. त्यात ६६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यातील सात दरोडेखोरांना अटक करुन सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत नितीन आनंदा सावंत (वय ३१ रा. शिरोली, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी नवजीवन यादवराव काकड (वय ३२, रा. चाकण), रामेश्वर चंपत नाईकवार (वय ३७, रा. निघोजे), इंद्रा भोलानाथ पेगो (वय २९, रा. चाकण), रघुनाथ श्रीराम काकड (वय ३३, रा. खालूंब्रे), राजकुमार विनायक हुकरे (वय २७, रा. इंदुरी, ता. मावळ), रोशन खुलसिंग राठोड (वय २०, रा. चाकण), दादाराव शिवाजी सावंत (वय ४०, रा. इंदुरी, ता. मावळ) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. बिस्वजीत रत्नेश्वर डोले (वय२८, रा. नाणेकरवाडी) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वासुली येथील द एस एफ ओ टेक्नॉलॉजीएस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करतात. संदीप अमोगसिद्ध शिवशरन आणि पुरुषोत्तम फुलेर सिंग हे दोघेजण कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. आरोपींनी सुरक्षा रक्षक संदीप आणि पुरुषोत्तम यांच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळले. त्यामुळे संदीप आणि पुरुषोत्तम चार तास गाढ झोपी गेले. दरम्यानच्या कालावधीत दरोडेखोरांनी कंपनीत प्रवेश करुन कंपनीतून ५३ लाखाचे ८६ केबल रोल,४ लाख ५० हजारांचे ११ केबल रोल आणि ९ लाखाचा एक केबल रोल असा एकूण६६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. पोलिसांनी सात दरोडेखोरांना अटक केली आहे. एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरु आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत