कारच्या धडकेत भाजी विक्रेत्याचा मृत्यू , कार चालक घटनास्थळावरून फरार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती मयत जनार्दन हे एआरएआय कंपनीसमोरील रस्त्यावर भाजी विक्री करत होते. गुरुवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास अज्ञात कार चालकाने कार भरधाव वेगात चालवून जनार्दन यांना जोरात धडक दिली.

    पिंपरी – रस्त्याच्या बाजूला भाजी विक्रीसाठी बसलेल्या एकाला भरधाव वेगातील कारने जोरात धडक देऊन फरफटत नेले. कार अंगावरून चालवून त्यांना गंभीर जखमी केले. त्यात भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाला. हा अपघात निघोजे येथे एआरएआय कंपनीसमोर गुरुवारी रात्री घडला.

    जनार्दन पुंजाजी पुंडगे (वय ५८) असे मृत्यू झालेल्या भाजी विक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नी कमलाबाई जनार्दन पुंडगे (वय ५०, रा. निघोजे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच १४/जेए ८७२७ कारवरील चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती मयत जनार्दन हे एआरएआय कंपनीसमोरील रस्त्यावर भाजी विक्री करत होते. गुरुवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास अज्ञात कार चालकाने कार भरधाव वेगात चालवून जनार्दन यांना जोरात धडक दिली. त्यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेऊन त्यांच्या अंगावरून गाडी चालवली. यामध्ये त्यांच्या छातीला, पाठीला, डोक्यात गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झाल्याने जनार्दन यांचा मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर आरोपी कार चालक घटनास्थळावरून पळून गेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.