रानगव्यानंतर पुण्यातील लोकवस्तीत हरणांच्या कळपाचे दर्शन; नागरिकांनी हरणांना काही खायला न देण्याच्या वनविभागाच्या सूचना

शिवणे व उत्तमनगर भागात हरणांचा कळप आढळून आल्याची घटना नुकतीच घडली आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) तुटलेल्या सीमाभिंतीतून हा  हरणांचा कळप बाहेर लोकवस्तीत आले होते.

पुणे: रानगव्यांनंतर आता शिवणे व उत्तमनगर भागात हरणांचा कळप आढळून आल्याची घटना नुकतीच घडली आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) तुटलेल्या सीमाभिंतीतून हा  हरणांचा कळप बाहेर लोकवस्तीत आले होते. शिवणेतील इंगळे कॉलनी येथील ‘आशिर्वाद टेरेस’ या सोसायटीला लागूनच एनडीए ची सीमाभिंत आहे. या भिंतीच्या मध्ये बुजवलेला ओढा (कॅनॉल) आहे. ही भिंत अनेक ठिकाणी जीर्ण झाली असून, काही ठिकाणी मोठी फट पडली आहे. एनडीए प्रशासनाने ही फट झाकण्यासाठी काही ठिकाणी पत्रे लावले आहेत. पण त्यातूनही ये-जा करता येते. त्यामुळे या सोसायटीत अनेकदा एखादे हरीण किंवा त्यांचे कळप बाहेर येताना अनेकदा निदर्शनास आले आहेत. सोमवारी देखील संध्याकाळच्या सुमारास असेच एक हरणांचे कळप बाहेर येऊन भटकंती करीत असल्याचे दिसून आले. काही ठरावीक अंतराने हा प्रकार होता असल्याने स्थानिकांनी वन विभागाला याची माहिती दिली. वन कर्मचाऱ्यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे.

आम्ही दोन कर्मचारी पाठवून या ठिकाणी पाहणी केली आहे. या तुटलेल्या भिंतीतून हरण बाहेर येत असल्याचे स्पष्ट होत आहे. एनडीए प्रशासनाला त्याबाबत कळविले असून त्यांना लेखी पत्राद्वारे हे काम प्राधान्याने करून घेण्याची विनंती करणार आहे. – दीपक पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विभाग

हरीण अधून मधून दर्शन देत असतात. पण सोमवारी हा कळप मुख्य रस्त्याच्या दिशेने जात असल्याचे दिसल्यावर त्यांना परत आतमध्ये हुसकावले. हा कळप जर रस्त्यावर गेला तर वाहनाच्या धडक बसून , किंवा भटके कुत्रेच्या हल्ल्यात त्यांच्या जिवीताला धोका होऊ शकतो. सीमाभिंत तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आहे. यामुळे एनडीएची सुरक्षितता देखील धोक्यात येत असल्याचे मत स्थानिक रहिवाश्यानी व्यक्त केले आहे.