चालत्या बसमध्ये ड्रायव्हरला आली फीट; महिलेने प्रसंगावधान राखत ‘असे’ वाचवले २४ प्रवाशांचे प्राण

बसचालकाला बस चालवताना चक्कर आल्यानंतर त्या महिलेने प्रसंगावधान राखत स्वतःच्या हातात स्टेअरिंग घेत चालकासह आपल्यासोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांचे प्राण वाचवले.

    पुणे : पुण्यातील वाघोली येथे एक अशी घटना घडली, त्यानंतर आता एका महिलेचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. बसचालकाला बस चालवताना फीट आल्यानंतर त्या महिलेने प्रसंगावधान राखत स्वतःच्या हातात स्टेअरिंग घेत चालकासह आपल्यासोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांचे प्राण वाचवले.

    योगिता सातव (Yogita Satav) असे या महिलेचे नाव असून, तिने केलेल्या धाडसाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वाघोली येथे महिलांचा एक ग्रुप बसने मोराची चिंचोळी येथे पर्यटनासाठी निघाला होता. यावेळी बस चालवत असताना चालकाला अचानक फीट आली. त्यामुळे त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले. तेव्हा योगिता सातव यांना ही बाब लक्षात आली. त्यावेळी त्यांनी चालकाला गाडी शेजारी थांबवायला सांगितले. चालकाने ही गाडी शेजारी थांबवली असता चालक खाली कोसळला. यानंतर योगिता यांनी परिस्थितीचे भान राखून बसचे स्टेअरिंग हातात घेतले आणि बस रुग्णालयाच्या दिशेने नेली.

    बस कधीही चालवलेली नाही : योगिता

    योगिता यांनी याआधी कधीही बस चालवलेली नव्हती. त्यांना फक्त कार चालवण्याचा अनुभव आहे. परंतु समोर आलेला प्रसंग पाहता हार न मानता योगिता यांनी बस चालवत ती सुरक्षितपणे हॉस्पिटलमध्ये पोहोचवत चालकाला जीवनदान दिले.