हातोडीने डोक्यात वार करत पुण्यात तरुणाची हत्या

मयत दशांत हा बुधवारी रात्री घरातून दुचाकी घेऊन बाहेर गेला. तो रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या घरचे त्याला शोधण्यासाठी बाहेर गेले असता दशांतचा मृतदेह नॅशनल हेवी कंपनीजवळ आढळला. मृतदेह आढळलेले ठिकाण पोलीस ठाण्यापासून काहीच अंतरावर आहे. गुरुवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास दशांतच्या वडिलांनी पोलिसांना माहिती दिली.

    पिंपरी : तळेगाव दाभाडे येथे एका तरुणाचा खून झाल्याची घटना गुरुवारी (दि. 23) मध्यरात्री नॅशनल हेवी कंपनीजवळ घडली. त्या तरुणाला सुरुवातीला गोळ्या झाडून मारल्याची माहिती मिळाली. मात्र शवविच्छेदन अहवालात त्या तरुणाचा मृत्यू गोळी लागल्याने नव्हे तर हातोडीने झाला असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून आरोपींनी देखील याची कबुली दिली आहे.

    दशांत अनिल परदेशी (वय 17, रा. तळेगाव दाभाडे) असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी त्याचे वडील अनिल परदेशी यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    मयत दशांत हा बुधवारी रात्री घरातून दुचाकी घेऊन बाहेर गेला. तो रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या घरचे त्याला शोधण्यासाठी बाहेर गेले असता दशांतचा मृतदेह नॅशनल हेवी कंपनीजवळ आढळला. मृतदेह आढळलेले ठिकाण पोलीस ठाण्यापासून काहीच अंतरावर आहे. गुरुवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास दशांतच्या वडिलांनी पोलिसांना माहिती दिली.

    घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालात दशांतवर गोळी झाडली नसल्याचे तसेच एखाद्या कठीण वस्तूने मारून खून केल्याचे निष्पन्न झाले.

    दशांतवर कुणी आणि का हल्ला केला याबाबत तळेगाव पोलिसांनी तपास करून दोघांना ताब्यात घेतले. यातील मुख्य आरोपी हा मयत दशांतच्या भावकीतीलच आहे. खुन्नस देण्याच्या कारणावरून त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु होता. आरोपींनी दशांतवर गोळी झाडली नसून हातोडीचे मागील अणकुचीदार टोक त्याच्या डोक्यात घुसवले आहे. ज्यामुळे गोळी लागल्या सारखी जखम होऊन दशांतचा मृत्यू झाला.