रस्त्यावर उसाची गाडी लावण्यावरुन केलेल्या मारहाणीत महिलेचा गर्भपात ; माजी आमदार मेधा कुलकर्णींनी केले होते रहिवाशांच्या कृत्याचे समर्थन

हिलेचा गर्भपातासारखा प्रकार घडल्यानंतरही कोथरुड पोलिसांनी सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले. माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी महापालिकेकडे तक्रार करुन रहिवाशांच्या कृत्याचे समर्थन केले. या उलट दाम्पत्यानेच मारहाण केल्याचा दावा केला होता. या घटनेनंतर मेधा कुलकर्णी, अनिता तलाठी व कुलकर्णी पितापुत्र या चौघांनी १९ मार्च रोजी येऊन तक्रार अर्ज मागे घे असे सांगून शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली.

    पुणे: कोथरुडमधील रामबाग कॉलनी मधील गणेश कुंज सोसायटीच्या सार्वजनिक रस्त्यावर उसाची गाडी का लावतो, असे म्हणून मारहाण करुन महिलेचा गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी पितापुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करत एकाला अटक केली आहे. जयेश ऊर्फ जित अनिरुद्ध कुलकर्णी (वय ३६, रा. गणेश कुंज सोसायटी, रामबाग कॉलनी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचे वडिल अनिरुद्ध उद्धव कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    कोथरुडमधील रामबाग कॉलनी मधील गणेश कुंज सोसायटीच्या सार्वजनिक रस्त्यावर एका कुटुंबाने उसाचा लाकडी चरकातून रस काढण्याची गाडी लावली होती. या गाडीमुळे त्रास होतो, असे रहिवाशांचे म्हणणे होते. १७ फेब्रुवारी रोजी जयेश व अनिरुद्ध कुलकर्णी या पिता पुत्रांनी उसाची गाडी का लावतो, असे म्हणून संतोष भोसले यांना शिवीगाळ करुन मारहाण केली होती. यावेळी त्यांची पत्नी मनिषा या भांडणे सोडविण्यासाठी गेल्या असताना या दोघांनी त्यांच्या पोटावर लाथ मारली. त्यानंतर भोसले यांनी त्यांच्या पत्नीला ससून रुग्णालयात नेले असता तेथे त्यांचा गर्भपात झाल्याचे आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    महिलेचा गर्भपातासारखा प्रकार घडल्यानंतरही कोथरुड पोलिसांनी सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले. माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी महापालिकेकडे तक्रार करुन रहिवाशांच्या कृत्याचे समर्थन केले. या उलट दाम्पत्यानेच मारहाण केल्याचा दावा केला होता. या घटनेनंतर मेधा कुलकर्णी, अनिता तलाठी व कुलकर्णी पितापुत्र या चौघांनी १९ मार्च रोजी येऊन तक्रार अर्ज मागे घे असे सांगून शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली.

    येथे उसाची गाडी लावायची नाही, अशी धमकी दिल्याची तक्रार केली होती. त्यावरुन कोथरुड पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास केल्यानंतर शुक्रवारी रात्री कोथरुड पोलिसांनी गर्भपात घडवूनआणणे व मारहाण केल्याबद्दल पितापुत्रांवर गुन्हा दाखल केला. जयेश कुलकर्णी याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहे.