माळेगावातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास; अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई

  माळेगाव : बारामती तालुक्यातल्या माळेगाव बुद्रुकमध्ये बेकायदा रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे हटविण्यात आली. या कारवाईमुळे माळेगाव परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असला तरी, लॉकडाऊनमुळे आधीच बेरोजगार झालेल्या व्यावसायिकांचा श्वास चांगलाच गुदमरला आहे. दुकाने पाडल्याने आता जगायचं कसं हा प्रश्न सध्या या व्यावसायिकांना पुढे उभा ठाकला आहे.

  माळेगाव नगरपंचायतीचे प्रशासक तथा तहसीलदार विजय पाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. आज सकाळी पोलिस आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेऊनच तहसीलदार माळेगावत दाखल झाले. त्यांनी सुरुवातीला क-हावागज रस्त्यालगत असलेली अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. सकाळी दुकाने उघडण्यासाठी आलेल्या व्यवसायिकांना दुकानासमोर जेसीबी आणि पोलिसांचा फौजफाटा दिसल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र अतिक्रमणांवर कारवाई केली जात असल्याचे सांगत प्रशासनाने या भागातली पत्र्याची शेड जेसीबीच्या मदतीने हटविण्यास सुरुवात केली. त्यानंतर मात्र या दुकानदारांनी समंजस भूमिका घेत आपापली अतिक्रमणे स्वतः काढून घेण्यासाठी सहकार्य केले.

  तहसीलदार विजय पाटील हे सकाळपासून या कारवाईत सहभागी झाले होते. गाळ्यांचे अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. मात्र, त्यांनी नोटिसा घेतल्या नाहीत. अखेर प्रशासक तहसीलदार विजय पाटील यांनी गाळ्यांचे अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी मंडलाधिकारी स्वाती गायकवाड, तलाठी प्रमिला लोखंडे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांच्यासह 35 पोलीस व नगरपंचायतीचे सुमारे चाळीस कामगार असा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

  अडचणी निर्माण करणाऱ्या लोकांना समजावून सांगत प्रसंगी कठोर भूमिका घेत प्रशासनाने शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या गेटपर्यंत ची सर्व अतिक्रमणे हटवली. त्यानंतर पुन्हा विरुद्ध दिशेची देखील सर्व अतिक्रमणे हटविण्यात आले आहेत. दिवसभर चाललेल्या अतिक्रमण मोहिमेत रस्त्यालगतची सर्व अतिक्रमणे काढण्यात प्रशासनाला अनेक वर्षानंतर यश आले आहे.

  गेल्या काही लॉकडाऊन सुरु असून, अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. त्यातूनही काही दुकानदारांनी कर्ज काढून दुकानांचा विस्तार केला होता. मात्र, दुकाने अडथळा निर्माण करत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओहाळ यांनी अतिक्रमणे काढण्यासाठी शिफारस केली होती. त्यानुसार अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.

  तहसीलदारांच्या कामाचे कौतुक

  अतिक्रमणविरोधी कारवाईमुळे तहसीलदारांच्या कामाचे कौतुक केले जात आहे. मात्र दुसरीकडे तहसीलदारांनी माळेगावच्या प्रशासक पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर लोकांना मूलभूत सुविधा देण्याऐवजी काही राजकीय मंडळींच्या मर्जीने काम सुरू केले आहे. नगरपंचायतीचा कार्यकाल सुरू झाल्यापासून लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. याशिवाय कागदपत्रांसाठी देखील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. मात्र प्रशासन उपस्थित नसल्याने लोकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे तहसीलदार विजय पाटील यांना तातडीने प्रशासक पदावरून हटवावे, अशी मागणी माळेगाव परिसरात होत आहे.

  गाळे धारकांना अतिक्रमण काढण्यासाठी वारंवार नोटिसा दिल्या होत्या. मात्र अतिक्रमण न काढल्याने आम्ही कारवाई करुन अतिक्रमणे काढली आहेत.

  विजय पाटील, प्रशासक तथा तहसीलदार

  गेल्या २० वर्षांपासून या जागेवर व्यवसाय करत आहे. त्यासाठी नियमित कर भरतो आहे. पोटाला चिमटा घेऊन व कर्जे काढून चांगला गाळा बांधला होता. लॉकडाऊनमुळे आमचे रोजगार बुडाले आहेत. अनलॉक नंतर दोन दिवसांपूर्वीच दुकान उघडण्याची परवानगी दिली होती. मात्र, त्यातच अशा पद्धतीने कारवाई केल्यामुळे आम्ही रस्त्यावर आलो आहे. आता जगायचं कसं हा प्रश्न आमच्यापुढे उभा आहे.

  रोहित भारत सोनवणे, गाळाधारक