जीवधोक्यात घालून काम करणाऱ्या ३५०० हजार कचरावेचकांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

अनेकदा लॉकडाऊन, उत्पन्नात होणारी घट आणि वैद्यकीय अडीअडचणींचा सामना करण्यात एक वर्ष होत आले. तरी पुण्यातील कोरोना योद्धे कचरा वेचक त्यांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या कोविड काळातील कामासाठी लागू झालेल्या प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी अजूनही वाट पाहत आहेत.

    पुणे: कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. मात्र कोरोनासारख्या महामारीच्या काळातही स्वतःच्या जीवाची परवा न करता कार्यरत राहणाऱ्या कचरा वेचकांना सद्यस्थितीला बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. कोविडच्या काळात करत असलेल्या कामाबद्दल प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या कोविड भत्त्यासाठी ताटकळत राहावे लागत असल्याचे समोर आले आहे. याबरोबरच सरकारकडून कोणत्याही प्रकारची आरोग्याच्या सुरक्षेची हमी देण्यात आले नसल्याची खंत कचरा वेचकांकडून व्यक्त केली जात आहे.

    कचरा वेचकांच्या उत्पन्नासाठी सहाय्य आणि जीवन विमा यासारख्या त्यांच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. आपल्या मूलभूत सुरक्षेसाठी कचरा वेचकांनी आता अजून काय करायचं? अस सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. १८ ऑगस्ट २०२० रोजी पालिकेच्या स्थायी समितीने एप्रिल’२० ते सप्टेंबर’ २० या कालावधीसाठी कचरा वेचकांना वस्तीतील कामासाठी मिळणाऱ्या प्रोत्साहन भत्त्यात १० रुपयांची वाढ ठराव संमत करून मंजूर केली होती. तरीदेखील, १० महिने उलटल्यानंतर मुख्य सभेमध्ये हा विषय अजून चर्चेसाठी देखील पटलावर आलेला नाही. असा आरोपही महापालिकेवर त्यांनी केला आहे.

    अनेकदा लॉकडाऊन, उत्पन्नात होणारी घट आणि वैद्यकीय अडीअडचणींचा सामना करण्यात एक वर्ष होत आले. तरी पुण्यातील कोरोना योद्धे कचरा वेचक त्यांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या कोविड काळातील कामासाठी लागू झालेल्या प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी अजूनही वाट पाहत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून, घरातील परिस्थती बिकट असताना देखील कचरा वेचकांनी ९८ टक्क्यांहून अधिक उपस्थितीत काम सुरु ठेवले. पण, त्यांच्या हाती पुन्हा एकदा निराशाच आली असल्याचे म्हणणे आहे.

    दारोदार जाऊन कचरा गोळा करणारे ३५०० कचरा वेचक नागरिकांकडून मिळणारे मासिक शुल्क व कागद, प्लॅस्टिक, मेटल, काच यासारखा भंगारचा माल विकून त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. लॉकडाऊनमध्ये दररोज कामावर येऊन सुद्धा सर्व प्रकारची दुकाने, बाजारपेठा आणि व्यवसाय बंद असल्याने त्यांना या ठिकाणाहून कोणतेही भंगार मिळाले नाही. रिसायकलिंग करणाऱ्या संस्था आणि भंगारची दुकाने देखील बंद असल्याने, कचरा वेचकांचे उत्पन्न ५० टक्क्याने कमी झाले.