लोणावळा नगरपरिषदेत आता प्रशासक राज !

गेली दोन वर्षे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नगरपरिषदेची मुदत संपत आली असताना देखील नवीन पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. नवीन सदस्य निवडून येईपर्यंत लोणावळा नगरपरिषदेत प्रशासकीय राजवट राहणार आहे.

    पिंपरी : लोणावळा नगरपरिषदेच्या (Lonavla Municipal Council) विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ १० जानेवारी २०२२ रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे मंगळवार (दि.११) पासून लोणावळा नगरपरिषदेत प्रशासकीय कारभार सुरु झाला आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुख्याधिकारी सोमनाथ जाधव हे प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.

    १४ डिसेंबर २०१६ रोजी पंचवार्षिक निवडणूक पार पडली. महाराष्ट्र नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ४०/१ नुसार नगरसेवकांची सभा ज्या तारखेला झाली तेव्हापासून पाच वर्षे हा सभागृहाचा कालावधी ग्राह्य धरला जातो. त्यानुसार १० जानेवारी २०२२ रोजी सभागृहाचा कार्यकाळ संपुष्टात आला.