उपमुख्यमंत्र्यांचा आला आदेश अन् अवघ्या दोन तासांतच झाला असा बदल…

  बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती नगरपरिषदेच्या इमारतीची पाहणी करत असताना इमारतीवर असलेल्या बारामती नगरपरिषद (Baramati Municipal Council) या फलकाचा रंग पुसट झाल्याने त्यांनी पदाधिकारी व मुख्याधिकार्‍यांना सदर फलक काढून त्या ठिकाणी दोन तासांत आकर्षक व उठावदार असा नवीन नाम फलक लावण्याच्या सूचना दिल्या. अजितदादांच्या या सूचनेनंतर नगरपालिकेने त्याठिकाणी दोन तासात नवीन फलक क्रेनच्या सहाय्याने लावला.

  यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात फ्लेक्स उभारून शहराचे विद्रुपकरण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, कोणी कितीही जवळचा असला तरी कारवाईस मागे पडू नका, तसा आदेश त्यांनी मुख्याधिकारी महेश रोकडे (Mahesh Rokade) यांना दिला.

  बारामती नगरपालिकेच्या वतीने उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री पवार बारामती नगरपालिकेच्या इमारतीमध्ये आले होते. गाडीतून उतरल्यानंतर नगरपालिका इमारतीच्या आजूबाजूची पाहणी केली. नगरपालिकेच्या आतमध्ये प्रवेश करत असतानाच इमारतीवर लावण्यात आलेल्या नामफलकाकडे उपमुख्यमंत्री पवार यांचे लक्ष गेले.

  कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या या अत्याधुनिक इमारतीच्या नामफलकावरील अक्षरांचा रंग पुसट झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी पवार यांनी उपस्थित नगरपालिका पदाधिकाऱ्यांना धारेवर धरून तातडीने दोन तासाच्या आत मला हा फलक काढून त्या ठिकाणी आकर्षक व योग्य रंगसंगती असलेला फलक लागला पाहिजे, अशी तंबी त्यांनी ‌दिली.

  मी दोन तासानंतर या ठिकाणाहून जाणार आहे, त्यावेळी बदललेला फलक मला दिसला पाहिजे, असा आदेश त्यांनी दिला. त्यामुळे नगराध्यक्ष मुख्याधिकार्‍यांनी अजितदादांच्या या आदेशाचे पालन करत सदर नाम फलक बदलण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. त्यानुसार दोन तासांच्या आत फलकावरील अक्षरे काढून त्या ठिकाणी आकर्षक पद्धतीने नवीन फलक लावण्यात आला.

  दरम्यान, नगरपालिकेच्या आतील भागामध्ये लिफ्टच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या कुंड्यांमधील काही रोपे सुकल्याचे अजित पवार यांच्या लक्षात आले. या झाडांची छाटणी देखील व्यवस्थित केली नसल्याने त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून ‌दिले. सुरुवातीला इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लिफ्टने उपमुख्यमंत्री गेले, परत येताना स्वतः पायी चालत खाली उतरले. यावेळी झपाझप चालणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांबरोबर चालत असताना शासकीय अधिकारी घामाघूम झाले.