‘आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत, आम्हालाही मराठा आरक्षण द्यायचं आहे’, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन अजित पवार संतापले

    पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन अजित पवार चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का? आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का ? पण शिवाजी महाराजांनी काय शिकवलंय? सर्वांना सोबत घेऊन जायलाच शिकवलंय ना ? इतर कुठल्या समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळाले पाहिजे हीच आमची भुमिका असल्याचे यावेळी अजित पवार म्हणाले.

    महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात ढोल ताश्यांची गजरात साजरी करण्यात आली. शिवनेरी गडावर शासकीय कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

    बाळासाहेब थोरात, दिलीप-वळसेपाटील आणि मी असेल, आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत. आम्हालाही मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. आरक्षण खोळंबून ठेवायला आम्हाला काय आनंद वाटतो का? असा सवाल करतानाच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. काही कायद्याच्या अडचणी आहेत. त्यातून मार्ग काढूनच आम्ही पुढे जात आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या तरुणांना खडसावले.