राज्यातील सर्व गुणवंत कामगारांची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करा: डॉ. भारती चव्हाण

कामगारांना आणखी प्रतिष्ठा मिळेल तसेच ते सामाजिक कार्यात आणखी उत्साहाने काम करतील. चालू वर्षी ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. त्या कामगारांनी आपले अर्ज जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करावेत तसेच ज्यांना गुणवंत कामगार पुरस्कार मिळून पाच वर्षे झाली आहेत त्यांनीही अर्ज करावेत, असेही आवाहन डॉ. भारती चव्हाण यांनी केले आहे.

    पिंपरी: राज्यातील सर्व गुणवंत कामगारांची ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ या पदावर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब नियुक्ती करावी अशी मागणी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी केली आहे. विविध आस्थापनांमध्ये कार्यरत असणाऱ्या निवडक कामगारांचा राज्य सरकार दरवर्षी गुणवंत कामगार पुरस्कार देऊन गौरव करते. या कामगारांचे कामाप्रती योगदान, सामाजिक व इतर क्षेत्रातील त्यांचे कार्य याचा विचार करुन निवड समितीच्या शिफारशीनुसार हि निवड करण्यात येते. या पुरस्कारप्राप्त कामगारांची राज्य सरकारने ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ पदावर नियुक्ती करुन शासन आदेशाची ताबडतोब अंमलबजावणी करावी. यामुळे अशा कामगारांना आणखी प्रतिष्ठा मिळेल तसेच ते सामाजिक कार्यात आणखी उत्साहाने काम करतील. चालू वर्षी ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. त्या कामगारांनी आपले अर्ज जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करावेत तसेच ज्यांना गुणवंत कामगार पुरस्कार मिळून पाच वर्षे झाली आहेत त्यांनीही अर्ज करावेत, असेही आवाहन डॉ. भारती चव्हाण यांनी केले आहे.

    महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने (दि. ३१ डिसेंबर २०१५ रोजी, विकास १११५/ प्र. क्र.८८/५) महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने व नावाने अवर सचिव प्र. ल. दराडे यांनी काढलेल्या आदेशातील पान क्र. चार आणि पाच वरील कलम 6 नुसार हि नियुक्ती करावी अशा मागणीचे पत्र डॉ. भारती चव्हाण यांनी पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना दिले. यावेळी सहसचिव संजय गोळे, पुणे शहराध्यक्ष महादेव धर्मे उपस्थित होते.

    या आदेशात नमुद केल्याप्रमाणे ‘गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार’ ची घोषणा झाल्यावर त्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींपैकी, ज्या व्यक्ती वरील परिच्छेद २ मध्ये नमुद केलेले निकष पुर्ण करीत असतील, अशाच व्यक्तींची जिल्हाधिकारी यांनी ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ म्हणून नियुक्ती परस्पर करावी. तसेच ज्या व्यक्तींना २००८ पुर्वी ‘गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार’ देण्यात आला आहे, अशा व्यक्तींनाही ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ म्हणून नियुक्ती देण्यात यावी. ही नियुक्ती त्यांच्या वयाच्या ७० वर्षांपर्यत चालू राहिल व वयाच्या ७० वर्षांनंतर त्यांना अनर्ह ठरविण्यात यावे. शासनाच्या नियमांनुसार गुणवंत कामगारांनी जिल्हाधिका-यांकडे अर्ज करावेत. याबाबत कामगारांनी अधिक माहितीसाठी समन्वयक तानाजी एकोंडे (९४२१९६८२५), संजय गोळे (८०८७६०८७२९), भरत शिंदे (९८८१९८६१९१) यांच्याशी संपर्क साधावा.