गुंजवणी प्रकल्पातील उपसा योजनांना मान्यता

तीन तालुक्यातील २४६२ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली
भोर : गुंजवणी चापेट प्रकल्पातील तीन स्वतंत्र पाणी उपसा योजनांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खास बाब म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे भोर, वेल्हे, हवेली तालुक्यातील सत्तावीस गावातील २४६२ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार असल्याची माहीती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली. मंत्रालय मुंबई येथे पाटील यांच्या समवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, पुरंदरचे संजय जगताप, पंढरपूरचे भारत भेलके, जलसंपदा विभागाचे सचिव संजय घाणेकर, सहसचिव अतुल कपोले,उपसचिव अभय पाठक, प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल,वेल्हयाचे सभापती दिनकर सरपाले आदी उपस्थित होते.

वाजेघर,वांगणी, शिवगंगा या उपसा योजनांना २०१८ मध्ये तत्कालीन सरकारने तत्वतः मान्यता दिलेली होती.परंतू त्यासाठी पाणी नाही असे महामंडळाने सांगितले होते. त्यामुळे पाणी कसे उपलब्ध करावयाचे यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी ‘प्रकल्पात उर्ध्व भागांत (बँक वाँटर)सहा टक्के पाणी राखीव आहे. ते हक्काचे पाणी आम्हाला मिळावे ते मिळाले नाहीतर स्थानिक पातळीवर प्रकल्पास मोठा विरोध होउन त्याचे तिव्र पडसाद उमटतील. पाणी कसे उपलब्ध करावयाचे याचा फेरविचार शासनाने करावा’ या गोष्टी थोपटे यांनी मंत्र्याच्या समोर मांडल्या. त्यावर ‘योजनांना पाणी कसे देता येईल याचा स्वतंत्रपणे अभ्यास करून करून खास बाब म्हणून मार्ग काढावा’ असे पाटील यांनी सचिवांना सांगितले. प्रकल्पामध्ये महामंडळाची सुमारे १२५ हेक्टर जमीन उपलब्ध आहे. तेथे पैठणच्या धर्तीवर ‘गार्डन प्रोजक्ट ’ करावा या मागणीला त्यांनी तत्वतः मान्यता दिली. तर प्रकल्पातील कांनदी नदीवर वेल्हे बुद्रुक ते धानेप मार्गासाठी पुल बांधावा. देवघर धरणाच्या डाव्या कालव्याव्दारे पाणी नेण्याच्या योजनेचे सर्व्हेक्षण करावे,अशा सूचना पाटील यांनी अधिकाऱ्यांंना दिल्याचे थोपटे यांनी सांगितले. यामुळे वाजेघर १४ गावे ५६०,वांगणी ५ गांवे ६३० तर शिवगंगा ५ गांवे १२७२ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे.